इस्थर अनुह्य़ा  हत्या प्रकरणात सीसीटीव्ही चित्रणात दिसणाऱ्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या संशयिताचे छायाचित्र आधार कार्ड यंत्र प्रणालीत टाकून तसेच सर्व परिवहन कार्यालयात पाठवून शोध घेतला जात आहे.
इस्थर अनुह्य़ा हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या फलाटावरील इस्थरचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. तिच्यासोबत एक संशयित इसम दिसला होता. पोलिसांनी तज्ज्ञांमार्फत या इसमाचे सुस्पष्ट छायाचित्र तयार करून घेतले आहे. त्याचे डोळे स्कॅन करून आधार कार्ड यंत्र प्रणालीत टाकून शोध घेतला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा संशयित इसम खासगी टॅक्सीचालक असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्याचे छायाचित्र मुंबईतील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठण्यात आले आहे. स्मार्ट कार्डमुळे संगणकात परवानाधारक चालकांच्या छायाचित्रांचा संगणकीकृत साठा असतो. त्यातून काही शोध लागतो का, ते तपासले जाणार आहे. आम्ही अनेकांची चौकशी केली आहे. इस्थरच्या खास मित्राचीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या कुणी दोषी आढळत नसले तरी कुणी निर्दोषही नाही, हे गृहीत धरून तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.