मालवणी परिसरातील दारूगुत्त्यांना आतापर्यंत गुजरातमधून इथेनॉल पुरविले जात होते. परंतु दारूकांड घडले त्याआधी इथेनॉलऐवजी मिथेनॉल पुरविले गेल्याची बाब तपासात नव्याने उघड झाली आहे. गुजरातमधील संबंधित व्यापाऱ्यांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असली तरी आता या व्यापाऱ्यांना पुरवठा करणाऱ्या प्रमुख व्यापाऱ्याचा शोध घेतला जात आहे. मिथेनॉलमुळे गहजब होऊ शकतो, याची कल्पना असतानाही जाणूनबुजून ते पुरविले गेले का, याची चौकशी आता केली जात आहे. या व्यापाऱ्याच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अद्याप गुजरातमध्ये आहे.

मालवणी तसेच आसपासच्या परिसरात असलेल्या दारूच्या गुत्त्यांवर गावठी दारू दिली जात नव्हती तर पाणीमिश्रित इथेनॉल गावठी दारू म्हणून दिली जात होती. दर १५ दिवसांनी इथेनॉलचे तीन ड्रम (सुमारे ८०० लिटर) पुरविले जात होते. गेले अनेक महिने हा प्रकार सुरू होता. इथेनॉलमध्ये पाणी मिसळून दिल्या जाणाऱ्या गावठी दारूबाबत उत्पादन शुल्क विभागापासून पोलिसांनाही माहिती होते. परंतु दारूकांड न घडल्याने ही बाब पुढे आली नाही. पाठविण्यात आलेल्या ड्रममध्ये इथेनॉलच आहे, असा समज करून घेऊन मालवणी परिसरात मिथेनॉलचे वाटप झाले.
दारूकांडास कारणीभूत असलेले मिथेनॉल चुकून पाठविले गेले,
असे अटकेतील व्यापारी सांगत आहेत. परंतु त्यात मिथेनॉल असल्याची माहिती या दारूकांडानंतरच मिळाली, असा दावाही या व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मिथेनॉल जाणूनबुजून पुरविले गेले का, या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.