मुंबई आणि उपनगरातील नामवंत महाविद्यालयांच्या पहिल्या प्रवेश यादीत वाढलेले प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) दुसऱ्या प्रवेश यादीतही चढेच आहेत. पहिल्या यादीच्या तुलनेत एखाद्या टक्क्याने गुण कमी झाले असले तरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत. बहुतेक महाविद्यालयांतील जागाही भरल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांची दुसरी प्रवेश यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. पहिल्या यादीनुसार नामवंत महाविद्यालयांचे पात्रता गुण हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते. काही महाविद्यालयांमध्ये ९५ टक्क्यांनाच पहिली प्रवेश फेरी बंद झाली. मात्र दुसऱ्या प्रवेश फेरीची स्थितीही पहिल्या फेरीपेक्षा फारशी वेगळी नाही. अर्धा ते एक टक्क्यानेच पात्रता गुण कमी झाले आहेत. विज्ञान शाखा, स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम काही महाविद्यालयांत कला शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण चढेच आहेत. वाणिज्या शाखेचे प्रवेश पात्रता गुण साधारण दीड ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहेत. मात्र तरीही बहुतेक नामवंत महाविद्यालयांची प्रवेश यादी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांवर थांबली आहे. काही नामवंत विनाअनुदानित महाविद्यालयांतील जागाही दुसऱ्या प्रवेश यादीत भरल्याचे दिसत आहे. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करायचे आहेत. त्यानंतर दुसरी यादी १७ ऑगस्टला जाहीर करण्यात येईल.