दिल्लीमध्ये सम-विषम क्रमांकाच्या खासगी गाडय़ा एक दिवसाआड चालवण्याचे सूत्र यशस्वी ठरले की नाही याचा अभ्यास करण्यात यावा. त्यानंतरच दिल्लीप्रमाणे मुंबईमध्येही सम-विषम क्रमांकाच्या गाडय़ा एक दिवसाआड रस्त्यावर चालवण्यात येऊ शकतील का, याचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
शादाब पटेल यांनी मुंबईतही सम-विषम सूत्र उपयोगात आणण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने न्यायालयाने दिल्लीत सम-विषम सूत्र यशस्वी ठरले आहे की नाही याबाबत विचारणा केली. मात्र त्याबाबत भिन्न मते असल्याची माहिती देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने आधी त्याबाबत अभ्यास करण्याची गरज असल्याचे म्हटले. त्यानंतर मुंबईत हे सूत्र लागू केले जावे की नाही याचा निर्णय दिला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले.

पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दहा उमेदवारी अर्ज वैध
पालघर : पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे अमित घोडा, माकपचे चंद्रकांत वरठा, तर बहुजन विकास आघाडीचे चार उमेदवार बहुजन मुक्ती पार्टीचे रवींद्र हिरा बालशी व दिलीप आत्माराम दुमाडा व अपक्ष म्हणून जानी शंकर वरठा या उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत.