प्रसाद रावकर

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात टिकून राहण्यासाठी, तसेच पंचतारांकित शहरांच्या पंक्तीत बसता यावे म्हणून मुंबई महापालिकेने सोमवारपासून मुंबईतील मोजक्या ४१ ठिकाणी संध्याकाळी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या अखेरच्या पंधरवडय़ात ‘स्वच्छ भारत’चे पथक पाहणीसाठी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे संध्याकाळच्या साफसफाईच्या अंमलबजावणीसाठी पालिकेची धावपळ उडाली आहे.

केंद्रामध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा ‘स्वच्छ भारत’ अभियानाची लगबग सुरू झाली आहे. देशातील विविध शहरांमध्ये स्वच्छताविषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एक ते सात तारांकनांसाठी अटी आणि शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. आपले शहर कोणत्या तारांकनात बसते हे कळविण्याची सूचना संबंधित यंत्रणांना करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने मुंबई पाचव्या तारांकनात बसत असल्याचे कळविले आहे. या तारांकनासाठी शहरामध्ये संध्याकाळी स्वच्छता केली जाते का या अटीचा समावेश आहे. पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीतील काही भागांत उदाहरणार्थ नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट आदी परिसरांत सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छता केली जाते. पालिकेचे सफाई कामगार उर्वरित मुंबईत दररोज नित्यनियमाने सकाळी साफसफाईचे काम करतात. मात्र संध्याकाळच्या वेळी तेथे पालिकेचा एकही सफाई कामगार दृष्टीस पडत नाही.

‘स्वच्छ भारत’ अभियानातील स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी पालिकेने मुंबईतील ४१ भागांमध्ये संध्याकाळी साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणांचा त्यात समावेश आहे. मुंबईमध्ये सकाळी आणि संध्याकाळी साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांचे तोकडे संख्याबळ आहे. त्यामुळे संध्याकाळी साफसफाईसाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या कामगारांसोबत संस्थांच्या कामगारांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानाचे पथक येत्या १५ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होत आहे. हे पथक ३१ डिसेंबपर्यंत मुंबईतच राहणार आहे. या काळात मुंबईत संध्याकाळी साफसफाई केली जाते का याची पथकामार्फत पाहणी केली जाणार आहे. पाहणीदरम्यान पथकातील अधिकारी दुकानदारांच्या छोटेखानी मुलाखती घेणार आहेत. संध्याकाळी साफसफाई केली जाते का याबाबतही दुकानदारांना विचारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने संध्याकाळच्या साफसफाईसाठी निवडलेल्या ४१ परिसरांमध्ये बाजारपेठा आणि गजबजलेल्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत संध्याकाळी साफसफाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांचीही मदत घेण्यात येणार आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त