अंथरुणावर खिळलेल्यांची सेवा करणाऱ्यांसाठी कार्यक्रम
ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सलाम सेवेला’ हा कृतज्ञता सोहळा येत्या शनिवारी २८ मे रोजी माटुंगा येथे आयोजित करण्यात आला आहे. मतिमंद, अपंगत्व आणि शारीरिक आजारामुळे अंथरुणावर खिळलेल्या मुलांची सेवा करणारे आई-वडील किंवा वृद्ध आई-वडिलांची, सासू-सासऱ्यांची सेवा करणारी मुले/ जावई/ सुना यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा मुलांमुळे किंवा घरातील वृद्ध व्यक्तींमुळे त्यांची सेवा करणाऱ्यांना चित्रपट, नाटक, संगीत किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमाला एकाच वेळी जाता येत नाही. लग्न, मुंज अशा घरगुती कार्यक्रमांनाही ते एकत्र जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शनिवारी होणारा कार्यक्रम खास अशा व्यक्तींसाठीच आयोजित केला आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मुळ्ये यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला दिली.
या वेळी मराठी आणि हिंदी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम होणार असून त्याचे संगीत संयोजन सागर साठे यांचे आहे. कार्यक्रमात अपंगांसाठी काम करणाऱ्या फेलोशिप ऑफ फिजिकली हॅण्डीकॅप (एफपीएच) या संस्थेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात येणार आहे. या मंडळींच्या सेवेला सलाम करण्यासाठी मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील काही प्रसिद्ध कलाकार या वेळी उपस्थित राहणार असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले.
यापूर्वी मुळ्ये यांनी ‘पोलीस हो तुमच्यासाठी’, ‘एक कुटुंब सुखी कुटुंब’, ‘असंही एक नाटय़ संमेलन’ असे आगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पण ज्यांना प्रसिद्धी मिळालेली नाही, अशा व्यक्तींना शोधून काढून मुळ्ये ‘माझा पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करतात.

दु:ख विसरण्यासाठी प्रयत्न
अंथरुणावर खिळलेल्या मुलांची सेवा करणाऱ्या आई-वडिलांनी किंवा वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या त्यांच्या मुलांनी/ सुनांनी/ जावई यांनी दोन घटका मजेत व आनंदात घालवाव्यात. काही वेळेसाठी आपले दु:ख विसरावे, हा या कार्यक्र माचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून अशोक मुळ्ये म्हणाले, कार्यक्रमासाठी आई-वडील या दोघांनीच यायचे असून मतिमंद किंवा अपंग मुलांना बरोबर आणू नये. ज्या मंडळीशी आपण दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधला आहे, त्यांनाच कार्यक्रमासाठी प्रवेश आहे.