शास्त्रीय गायन आणि वादन याची युवा पिढीलाही आवड आहे. रसिक युवक अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असतात. युवा कलाकारांना प्रोत्साहन आणि या कलाकारांकडे पाहून नवे युवा कलाकार तयार व्हावेत या उद्देशाने हृदयेश आर्ट्सतर्फे ‘गानप्रभा युवा संगीतोत्सव’ आयोजित करण्यात येतो. महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे. यंदाच्या युवा संगीत महोत्सवात गानरसिकांना विविध गायन व वादन मैफलीचा आनंद घेता येणार आहे.

तीन दिवसांच्या या संगीतोत्सवात उदयोन्मुख युवा कलाकाराला राघवेंद्र बेनगिरी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार १४ वर्षांचा गायक सोहम परळे याला तर तन्वी सामंत स्मृती पुरस्कार तबलावादक तनय रेगे यांना प्रदान केला जाणार आहे. संगीतोत्सवाच्या पहिल्या दिवशी दीपिका भिडे (गायन), आदित्य आपटे (सरोदवादन), अनु राय (गायन), दुसऱ्या दिवशी झुबेर शेख (सतारवादन), भूपाल पणशीकर (गायन), कैलास पात्रा (व्हायोलिनवादन) तर समारोपाच्या दिवशी अनुजा झोकरकर(गायन), वरद कठापूरकर (बासरीवादन), निषाद बाक्रे (गायन) हे युवा कलाकार सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या संगीतोत्सवास संगीतप्रेमी रसिकांना मुक्त प्रवेश आहे.

  • कधी- शुक्रवार २७ मे, शनिवार २८ मे आणि रविवार २९ मे २०१६ (सायं. ६.३० वा.)
  • कुठे- साठय़े महाविद्यालयाचे सभागृह, विलेपार्ले (पूर्व)

 

‘प्रात:स्वर’मध्ये चंद्रशेखर वझे यांचे गायन

शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि त्यांचे प्रहर ठरलेले आहेत. तो तो राग त्या त्या प्रहरातच गायला जातो. सकाळच्या प्रहरातीलही काही राग असून ते प्रात:काळी गायले जातात. सकाळी गायल्या जाणाऱ्या रागांची मैफल ही संकल्पना घेऊन ‘पंचम निषाद’ संस्थेतर्फे ‘प्रात:स्वर’ ही मैफल आयोजित करण्यात येते. ऑक्टोबर ते मे या महिन्यांत एका रविवारी सकाळी पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर प्रांगण, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. नवोदित आणि दिग्गज कलाकारांनी यात आपली गायन कला आतपर्यंत सादर केली आहे. याच मालिकेत आता चंद्रशेखर वझे यांचे शास्त्रीय गायन होणार असून ‘प्रात:स्वर’ मालिकेतील हा ८० वा कार्यक्रम आहे. वझे यांनी अनेक संगीत समारोह आणि मैफलींमध्ये आपले गायन सादर केले आहे. २०१० मध्ये पुण्यात ५७ व्या सवाई गंधर्व महोत्सवातही त्यांनी आपले गायन सादर केले होते. या मैफलीत वझे यांना ऋग्वेद देशपांडे (तबला) व अनिरुद्ध गोसावी (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत. ‘प्रात:स्वर’ मैफलीसाठी रसिक श्रोत्यांना विनाशुल्क प्रवेश आहे.

  • कधी- रविवार, २९ मे २०१६
  • कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
  • केव्हा- सकाळी साडेसहा वाजता.

 

मुंबई मेरी जान

शाहीर पठ्ठे बापुराव यांनी ‘मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका,’ असे म्हटले होते. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई या मायावी नगरीचे सगळ्यांनाच आकर्षण आहे. देशाच्या विविध भागांतून प्रत्येक जण मुंबईत येत असतो. मुंबईत आपल्याला काही ना काही काम मिळेल, उपाशी राहावे लागणार नाही, हा विश्वास त्यामागे असतो. मुंबईचे हे प्रतिबिंब हिंदी चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांबरोबरच साहित्यात आणि चित्रातूनही पाहायला मिळते. चित्रकार सचिन भनगडे यांनी ‘मुंबई मेरी जान’ या चित्रप्रदर्शनातून याच मुंबईचे दर्शन घडविले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, नरिमन पॉइंट, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, मुंबईतील जुने पूल, ओसंडून वाहणारी गर्दी, गगनचुंबी इमारती भनगडे यांनी रेखाटल्या आहेत. मायावी नगरीची विविध रूपे मुंबईकरांना चित्रांच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुले आहे.

  • कधी- शुक्रवार २७ ते २९ मे २०१६
  • कुठे- नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, वरळी,
  • केव्हा- स. अकरा ते सायं. सात वाजेपर्यंत

 

स्वातंत्र्यवीरायण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘स्वातंत्र्यवीरायण-एक असामान्य प्रवास’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. क्रांतिकारांचे मुकुटमणी अशी ओळख असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड होते. त्यांचा जीवनपट या नाटकातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • कधी- शुक्रवार, २७ मे २०१६
  • कुठे- स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
  • केव्हा- सायंकाळी सात वाजता

 

हिंदी चित्रपटातील मुजरा नृत्याची मैफल

हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या विविध प्रकारात ‘मुजरा नृत्य’ हा एक लोकप्रिय प्रकार आहे. जुन्या काळी राजे-महाराजे तसेच संस्थानिकांच्या दरबारात मुजरा नृत्याच्या मैफली होत असत. खासगी बैठक किंवा कोठीवर आजही काही प्रमाणात मुजरा नृत्य रंगते. हिंदी चित्रपटातील काही मुजरा नृत्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविले आहे. यात ‘दिल चीज क्या है’, ‘सलामे इश्क मेरी जान’, ‘नजर लागी राजा तोरे बंगले पर’, ‘इन्ही लोगोंने लिया दुपट्टा मेरा’, ‘इन आखों की मस्ती से’, ‘कजरा मोहब्बतवाला’ या व अन्य काही मुजरा नृत्यांच्या गाण्यांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटातील गाजलेली मुजरा नृत्ये रंगमंचावर पाहायला मिळाली तर, प्रेक्षकांनाही ती नक्कीच आवडतील. संदीप बेंद्रे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या मुजरा नृत्याच्या ‘शमा ए महफिल’ या कार्यक्रमाची निर्मिती संदीप पवार, सुधीर चित्ते, सुदीप बेंद्रे यांनी केली आहे. रंगमंचावर ही गाणी नंदा भामरे, रुपाली वरडकर, करिष्मा आठवले, संतोष पाटील हे गाणार असून  प्रियांका शेट्टी, उल्का दळवी, मार्गरेट लेनी, प्रज्ञा कोळी, सारिका मुंबईकर, नीता पाटील हे त्यावर नृत्य सादर करणार आहेत. क्षमा आर्ट वर्ल्ड व गणेश प्रॉडक्शन यांची ही निर्मिती आहे.

  • कधी- शुक्रवार, २७ मे २०१६
  • कुठे- आचार्य अत्रे नाटय़गृह, कल्याण</li>
  • केव्हा- रात्री आठ वाजता

 

संगीत बैठकीत संवादिनी जुगलबंदी

शिवाजी पार्क नागरिक संघातर्फे संगीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतरसिकांना संवादिनीच्या जुगलबंदीचा आनंद घेता येणार आहे. डॉ. मनीषा कुलकर्णी व मोहिनी चारी यांची संवादिनी जुगलबंदी या वेळी होणार आहे. मुक्ता रास्ते या त्यांना संगीतसाथ करणार आहेत. यानंतर कोलकोता येथील गायिका रूपा चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना अभय दातार (तबला) व अनंत जोशी (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत.

  • कधी- शुक्रवार (सायं. ५.३० वा.)
  • कुठे- शिवाजी पार्क, दादर (प)

 

सुगम संगीत संध्या

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मरणार्थ पौडवाल परिवाराने हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे. सुगम संगीत संध्या या कार्यक्रमात मानसी जोशी, ऋतुजा पांडे, आदिती आमोणकर, सौरभ पानदरे, वरद केळकर, अभिषेक सराफ, उत्कर्षां तेलंग यांचा यात सहभाग असून ते विविध गाणी सादर करणार आहेत. सागर साठे व सहकारी संगीतसाथ करणार आहेत.

  • कधी- शनिवार, २८ मे २०१६
  • कुठे- दादर-माटुंगा संस्थेचे सभागृह, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा, दादर (पश्चिम)
  • केव्हा- सायंकाळी पाच वाजता

‘वीकेंड विरंगुळा’साठी शुक्रवार ते शनिवार या तीन दिवसांत होणाऱ्या विविध साहित्य, सांस्कृतिक, मनोरंजन, संगीत मैफल आदी कार्यक्रमांची माहिती  shekhar.joshi@expressindia.com  या संकेतस्थळावर ‘पीडीएफ’ स्वरूपातील फाइलमध्ये किंवा ०२२-२२८२२१८७ या फॅक्स क्रमांकावर ‘वीकेंड विरंगुळा’साठी असे लिहून पाठवावी.

 

‘एनसीपीए’मध्ये संगीत मैफल

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट अर्थात ‘एनसीपीए’तर्फे एका संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत सुरुवातीला रविशंकर उपाध्याय यांचे पखवाज वादन होणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन होणार असून संगीतसाथ सुधांशु कुलकर्णी (संवादिनी) व शंतनु शक्ल (तबला) यांची आहे. कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नाही.

  • कधी- शुक्रवार, २७ मे २०१६
  • कुठे-एनसीपीए, नरिमन पॉइंट, मुंबई
  • केव्हा- सायंकाळी साडेसहा वाजता