‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची मोहोर उमटविलेला ‘संगीतबारी’ हा कार्यक्रम शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. निर्माते व दिग्दर्शक अजित भुरे यांच्या ‘ट्रस्ट द थेस्पियन’तर्फे याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर येथे झालेल्या या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.
महाराष्ट्रात सुमारे ४५ संगीतबारी कलाकेंद्रे असून येथे अनेक पाटर्य़ा आपली लावणी कला सादर करत आहेत. शहरी भागातील प्रेक्षकांना ‘संगीतबारी’ कला प्रकाराची फारशी माहिती नाही. शहरी भागातील पांढरपेशा रसिकांना याची ओळख करून देण्यासाठी ‘संगीतबारी’ची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत नाटक कला अकादमीच्या पुरस्कारविजेत्या शकुंतलाबाई नगरकर, मोहनाबाई महाळंग्रेकर यांच्यासह गीता लाखे-वाईकर, पुष्पा सातारकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘आर्यभूषण थिएटर’ पुणेचे चंद्रकांत लाखे, सुनील जावळे, सुमीत कुडाळकर हे वादक त्यांना संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे लेखन भूषण कोरगावकर यांनी केले असून दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे असून ‘संगीतबारी’चे निवेदन हेच दोघे करणार आहेत.