माहिती अधिकारात तपशील उघड

महाराष्ट्रात प्रतिदिन किमान दोन व्यक्ती आपला धर्म बदलतात, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. मात्र याबाबत नेमका तपशील देण्यात आलेला नाही. भारतीय राज्य घटनेने धर्म बदलण्याचा अधिकार दिला असून त्यानुसार अनेक जण अर्ज करतात. या संख्येत गेल्या तीन वर्षांत तिपटीने वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

नाव तसेच जन्म दिनांक बदलण्यासोबतच किती जण धर्म बदलतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितली होती. त्यावेळी त्यांना २०१४ ते २०१६ या वर्षांतील माहिती शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाने दिली आहे. या माहितीनुसार, २०१४ मध्ये २४७ तर २०१५ मध्ये ६१५ आणि २०१६ मध्ये ७९७ नागरिकांनी धर्म बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्म बदलण्यासाठी अर्ज करण्याबरोबरच त्याबाबतचे रीतसर कारणही द्यावे लागते. अन्यथा अर्ज फेटाळण्याचे अधिकारही बहाल करण्यात आले आहेत. मात्र अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. २०१४ मध्ये ३३, २०१५ मध्ये ६० तर २०१६ मध्ये ४५ अर्ज फेटाळण्यात आले. या शुल्कापोटी शासनाच्या तिजोरीत सहा लाख ७० हजार ३२६ रुपये जमा झाले.

नाव बदलण्यासाठी शेकडो पटींनी अर्ज करण्यात आले आहेत. त्यातून शासनाची कोटय़वधी रुपयांची कमाई झाली आहे. २०१४ मध्ये ५९,२०० नागरिकांनी नाव बदलण्यासाठी एक कोटी ४८ लाख ४९२ रुपये शुल्क भरले. २०१५ मध्ये १,५६,४७७ नागरिकांनी ६ कोटी ८७ लाख २६५ रुपये तर २०१६ मध्ये १,८२,९७७ लोकांनी नाव बदलण्यासाठी शासनाला ८ कोटी ३७ लाख २१ हजार ४६४ रुपये शुल्कापोटी अदा केले.

untitled-6