22 January 2021

News Flash

प्रतिकारशक्ती औषधांच्या विक्रीची तुफान लाट! औषध विक्रेत्यांना सुगीचे दिवस

औषध विक्री करणाऱ्यांचा संपूर्ण वर्षाचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यात झाला आहे

फोटो सौजन्य- PTI

संदीप आचार्य 
मुंबई: भर दुपारीही औषधाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग होती… रांग बघून राजाभाऊंनी बाईकला किक मारून दुसरे मेडिकल गाठले खरे पण तेथे तर पहिल्या दुकानापेक्षा जास्त मोठी रांग होतील. रांगेतील जवळपास प्रत्येकाला कोणते तरी शक्तीवर्धक औषध हवे होते. करोनाच्या लढाईत जो तो आपल्या शरीरात शक्तीवर्धक औषधांची मात्रा भरून घेतो आहे. यामुळे औषध विक्री करणाऱ्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहेत. संपूर्ण वर्षाचा धंदा गेल्या दोन महिन्यात झाला आहे.

“मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरी भागात त्यातही उच्चभ्रू वस्त्यांमधील प्रत्येक औषध विक्री करणाऱ्या दुकानदाराला विश्रांती अशी मिळतच नाही. सकाळी दुकान उघडल्यापासून रात्री दुकान बंद होईपर्यंत दुकानाबाहेर रांग असतेच असते. कोणी व्हिटॅमिन ‘सी’ च्या गोळ्या मागतो तर कोणी व्हिटॅमिन ‘इ’च्या गोळ्यांची विचारणा करतो. बी कॉम्प्लेक्सपासून नेटवर शोधून शोधून लोक व्हिटॅमिनच्या गोळ्या विकत घेताना दिसतात. अगदी झंडु पंचारिष्टपासून ते च्यवनप्राशपर्यंत ज्याला व्हिटॅमिन म्हणता येईल अशी प्रत्यक गोष्ट सध्या तुफान खपत आहे” राजेश ठाणावाला या औषध विक्रेत्याने सांगितले. औषध विक्री करणाऱ्या सर्व दुकानांना करोना पावल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

करोनाच्या पहिल्या टप्प्यात मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदींची उदंड विक्री झाली. ती अजूनही सुरुच आहे. त्यानंतर काही काळ हायड्रोक्लोरोक्विन किंवा तत्सम गोळ्या प्रत्येकजण विचारत होता. आता प्रत्येकालाच प्रतिकार शक्तीवर्धक औषधे व गोळ्या हव्या आहेत. लोकांना काय झालय तेच समजत नाही, अॅलोपथीची औषधे नसतील तर आयुर्वेदिक औषधेही घेऊन जातात. नसतील तर होमिओपॅथी औषधांचीही विचारणा अॅलोपथी औषध विक्री करणाऱ्या दुकानात करतात असे मनुभाई शहा या अन्य एका औषध विक्रेत्याने सांगितले. ‘अरे आप भी अभी होमिओपॅथी दवा बेचो’ असा सल्लाही औषध घ्यायला येणारे सहज जेऊन जातात असेही मनुभाई म्हणाले.

“एरवी ज्या औषधांची अपवादाने विचारणा होते अशी अनेक आयुर्वेदिक औषधांची विचारणा सध्या आमच्याकडे होत असल्याचे आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे मिलिंद कुलकर्णी म्हणाले. अश्वगंधा, सफेद मुसळीपासून ते विविध आसवांपर्यंत प्रत्येक आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढली आहे. मधुमेहाच्या रुग्णांकडून मेथी व आवळा पावडरीची मागणी खूपच वाढली असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांमुळे आयुर्वेदाविषयीच्या आमच्याही ज्ञानात भर पडते” असे मिश्किलपणे कुलकर्णी म्हणाले.

होमिओपॅथीची औषधे विकणाऱ्यांनाही करोनामुळे सुगीचे दिवस आले आहेत. कालपर्यंत प्रत्येक्ष रुग्णाला सखोल तपासून व तासभर माहिती घेऊन औषधे देणारे होमिओपॅथी डॉक्टरही आता फोनवरून पटापट प्रतिकारशक्ती वाढणारी होमिओपॅथी औषधे सांगू लागले आहेत. कालपर्यंत रुग्ण बघीतल्याशिवाय व लक्षणे तपासल्याशिवाय होमिओपॅथी औषधांची मात्रा निश्चित करता येत नाही. रुग्णानुसार औषधाची मात्रा दिल्यासच औषध योग्य प्रकारे लागू पडते असे उच्चार सांगणारे होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टर करोनावर अॅलोपथीमध्ये कोणतेही औषध नाही त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आमची औषधे वापरण्यास काय हरकत आहेत असा सवालच नव्हे तर आग्रह करत आहेत. काही आयुर्वेदिक व होमिओपॅथी संघटनांनी शासनाला पत्र लिहून आमची औषधे करोना रुग्णांना वापरून बघा अशी मागणीही केली आहे.

करोनाच्या लढाईत प्रतिकारशक्ती वाढवणे हा एक प्रमुख मुद्दा बनला आहे. अशावेळी मागे राहिल तर ते ‘अमुल’ कसले. अमुलनेही ‘आता प्रतिकारशक्तीसाठी अमुल दूध’ अशी जोरदार जाहिरात सुरू केली आहे. ‘अमुल’चे हळदी दूधही बाजारात आले आहे. सध्या माध्यमातून व चॅनलवर आपल्या औषधांमध्ये प्रतिकारशक्ती किती जोरदार आहे याची जाहिरात खूपच जोरात सुरु आहे. यात दुधात घालून घेण्याच्या शक्तिवर्धक औषधांचीच केवळ नव्हे तर वेगवेगळ्या मध विक्री करणाऱ्या कंपन्यांनीही आपलाच मध कसा शुद्ध व ‘गुणकारी’ आहे ते  जाहिरातीतून सांगण्याची चढाओढ लावली आहे. करोनाच्या धास्तीपोटी ग्राहक राजा या जाहिराती बघून औषध विक्री करणाऱ्या दुकानांपुढे रांगा लावून उभा आहे आणि विक्रेतही मिठ्ठास हसून ‘ये भी दवा ले के देखो’… असे सांगत ग्राहकाच्या खिशात सहज हात घालताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 4:00 pm

Web Title: every type of immune drugs sales high in last two months in mumbai thane pune and other cities scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मनसे अध्यक्ष राज ठाकरे विना मास्क मंत्रालयात
2 मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
3 गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं उद्या लग्न; ‘या’ अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ
Just Now!
X