कळवा येथील लघु पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता १४ टक्के पाणी कपात लागू केल्याने ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीने दर बुधवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या पाणी बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांपुढे आता पुन्हा पाणी संकट उभे राहिले असून त्याचा सामाना करावा लागणार आहे. दरम्यान, या बंदच्या काळात महापालिकेने स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याने काही भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
उल्हास नदीतील पाणी साठा मे अखेपर्यंत कसा पुरेल, याकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागामार्फत दरवर्षी नियोजन करण्यात येते. यंदाही उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता १४ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय कळवा लघु पाटबंधारे विभागाने घेतला आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम पाणी पुरवठा कंपनी उल्हास नदीतून पाणी घेते. या कपातीमुळे स्टेम पाणी पुरवठा कंपनीने शहराला होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर या बंदच्या काळात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा मात्र सुरळीतपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्पलेक्स आदी परिसराचा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. दरम्यान, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसर उंचावरील भागात असल्याने या भागाचा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.
येथे पाणी नाही : सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर आणि मुंब्रा.