देशाला मातेचा दर्जा देणाऱ्या भारतभुमीत दिल्लीसारखी घटना घडणे, हे अत्यंत दु:खदायक असून याबाबत सर्वानीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपींना कडक शासन झाले पाहिजे तसेच अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येकानेच आता पोलीस बनले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी ठाण्यात केले. ठाणे वाहतूक पोलिसांनी २४ व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त सोमवारी परेड मैदानात संचलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता अमिताभ बच्चन उपस्थित होते. नागरीक सुरक्षित तर देश सुरक्षित राहील, त्यासाठी प्रत्येकाने देशातील कायद्याचे पालन करायला हवे, त्यामुळे देशाची प्रतिमा नक्कीच उंचावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांचे काम कठीण असून शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते. ते २४ तास काम करतात, त्यामुळे आपण सुरक्षित असतो. काही वेळेस त्यांना प्राणाची आहुतीही द्यावी लागते. त्यामुळेच पोलिसांबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थेला महत्वाचे स्थान असून त्यातूनच देशाचे प्रतिबंब दिसत असते. शिस्त ठेवली नाहीतर वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. परदेशात गेल्यानंतर तेथील नागरीक कसे वागतात आणि तेथील वाहतूक व्यवस्था कशाप्रकारे आहे, यावरून माझ्या मनात त्या देशाचे प्रतिबिंब तयार होते. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावयाची असेल तर देशात शिस्त ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. परदेशात रात्रीच्या वेळी कुणी नसतानाही सायकलस्वार वाहतूक नियमाचे पालन करतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाने पोलिसांच्या नियमाचे पालन केले पाहिजे तसेच स्वत: बरोबर इतरांनाही शिकवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. नागरीकांनी सावधानता बाळगली तर सर्वाचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे आपल्या आणि इतरांसाठी वाहतूक नियमांचे पालन करा, असे आयुक्त रघुवंशी यांनी सांगितले. तसेच पोलीस कल्याण निधीसाठी अमिताभ बच्चन यांनी ११ लाख रूपयांचा निधी दिला असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच अमिताभ बच्चन यांच्या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्यही सादर केले.

माझा आवाज आणि प्रतिमेमुळे नागरिक प्रभावीत होत असतील तर ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारा लघुपट तयार करावा, त्यामध्ये स्वत: काम करेन आणि त्याचा खर्चही करेन, अशी ग्वाही अमिताभ बच्चन यांनी दिली.