उल्हासनगरमधील इंदर भटिजा यांच्या हत्येप्रकरणी या प्रकरणातील आरोपी माजी आमदार व नगरसेवक पप्पू उर्फ सुरेश कलानी याच्यासह तीन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षातर्फे शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. पप्पू यांच्या शिक्षेवर निर्णय होणार असल्याने शनिवारी न्यायालयात तुडुंब गर्दी होती. मात्र न्यायालयाने शिक्षेचा निर्णय मंगळवारी होणार असल्याचे जाहीर केले.
सरकारी वकील विकास पाटील यांनी सांगितले की पप्पू कलानी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे या प्रकरणात फाशीची शिक्षा देणे योग्य आहे. या वेळी कलानी यांच्या वकिलांनी, भटिजा हे कलानी यांचे नातेवाईक होते. ते त्यांची हत्या करू शकत नाहीत, अशी बचावाची बाजू मांडली. २३ वर्षांपूर्वी इंदिर भटिजा हे कामावर जात असताना त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात पप्पू कलानीसह सहा जण आरोपी होते. दोन जणांना शुक्रवारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निदरेष सोडले. पप्पुसह चार आरोपींना मात्र दोषी ठरविण्यात आले आह़े