मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा घोळ

मुंबई : पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाची पहिल्या सत्राची परीक्षा पंधरवड्यावर आली असूनही या मुंबई विद्यापीठातील या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. परीक्षेची तयारी कशी करायची असा पेच नुकत्याच प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढे आहे. तसेच प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने परीक्षा होणार की नाही याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

करोनाकाळात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी असल्याने विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया बराच काळ सुरू ठेवली. परंतु आता विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील परीक्षा जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षांचेही वेळपत्रक जाहीर केले. पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाची प्रथम सत्र परीक्षा १७ मे रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे नुकताच प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी अवघ्या काही दिवसांच्या तयारीवर परीक्षेस  कसे सामारे जावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने परीक्षा होणार आहेत का, की त्या पुढे ढकलल्या जाणार आहेत, स्वरूप काय असेल असे अनेक प्रश्न प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. ‘काही दिवसांवर परीक्षा येऊनही विद्यापीठाने त्याचे कोणतेही नियोजन केले नाही. विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळालेले नाही. किती विद्यार्थ्यांच्या किती जागा शिल्लक आहेत, कितीकाळ प्रवेश प्रक्रिया चालेल याचेही उत्तर विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षेबाबत मोठी गोंधळाची स्थिती आहे,’ असे स्टुडंट लॉ कॉन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

करोनामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी होत्या. त्यामुळे कोणत्याही विद्याथ्र्याची गैरसोय होऊ नये किंवा प्रवेश प्रक्रिया थांबल्याने त्याचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली होती. परंतु आता ९९ टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहेत. क्वचित कुठेतरी एखादी जागा शिल्लक असेल. त्यामुळे येत्या दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया थांबवून परीक्षेच्या तयारीला लागणार आहोत. उशिरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही परीक्षा विभागाशी चर्चा सुरू आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल.

-डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव