करोना, टाळेबंदी, घटलेले रोजगार यांमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांना बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा निम्म्याने घटल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा बाहेरून देण्याला गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत होता. यंदा मात्र अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचा परीक्षांसाठीचा प्रतिसाद जवळपास निम्म्याने घटला आहे. यंदा बारावीसाठी २४ हजार ७१५ अर्ज आले. गेल्यावर्षी मात्र ४३ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी बाहेरून परीक्षा दिली होती. दहावीला १७ हजार ४५ अर्ज आले असून गेल्यावर्षी १२ हजार ३७४ अर्ज आले होते.

यंदा बाहेरून परीक्षेचे म्हणजे १७ क्रमांकाचे अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. २ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २८ नोव्हेंबपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने वाढवून ३१ डिसेंबपर्यंत करण्यात आली. दोन महिने मुदत देऊनही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

कारण काय?

– बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने काम करताना शिकणाऱ्या, शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. शाळेचे शुल्क भरणे शक्य नाही असे अनेक विद्यार्थी १७ क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षा देतात.

– यंदा अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा कलही कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावण्याकडे आहे, असे निरीक्षण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यानी नोंदवले.

– अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणेही शक्य नाही. काही कुटुंब त्यांच्या गावी स्थलांतरीत झाली आहे, त्यांच्यापर्यंत अर्ज भरण्याबाबत माहिती पोहोचली नसण्याची शक्यता आहे.

– तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळेही अर्ज भरणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली.

अर्ज भरण्यासाठी आणखी एक संधी

राज्यमंडळाने १७ क्रमांकाचा अर्ज भरण्याची अजून एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ११ ते २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थी अर्ज भरू शकतील, तर १२ ते २७ जानेवारी या कालावधीत मूळ अर्ज, शुल्क भरल्याची पोचपावती आणि कागदपत्रे अर्जावर दिलेल्या केंद्रात जमा करायची आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे.