एकदा शब्द दिला, की त्यासाठी कोणताही किंमत मोजण्याची आपली तयारी आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. पण शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या हट्टापायी यांचे कट्टर अनुयायी मात्र महापालिका प्रशासनाला दिलेला शब्द विसरून गेले आहेत.  शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क मैदानावर जागा मिळावी, यासाठी खासदार संजय राऊत व महापौर सुनिल प्रभू यांनी पालिकेकडे लेखी परवानगी मागितली होती. अंत्यसंस्कारानांतर सदर जागेची साफसफाई करून देण्याची पालिकेची अट मान्य केल्यानंतरच या जागी अंत्यसंस्कारासाठी पालिकेने परवानगी दिली होती. आता मात्र सेनेचे हे दोन्ही नेते आपला शब्द फिरवून भावनिक राजकारण करत असल्याचे पालिकेतील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर १७ नोव्हेंबर रोजी संजय राऊत व महापौर सुनिल प्रभू यांच्या लेखी मागणीनुसार पालिका अधिनियम ४४०(२) अन्वये अपवादात्मक बाबा म्हणून शंभर चौरस फूट जागेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. सदर जागा एक दिवसासाठी देण्यात आली असून अंत्यसंस्कार विधीचा संपूर्ण परिसर साफसफाई करून परत देण्याचे तसेच अंत्यसंस्कारविधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी सदर जागा वापरली जाणार नाही, याची लेखी हमी या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेच्या वतीने दिली. आता मात्र या जागेवर स्मारक उभारण्याचा आग्रह सुरु झाल्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी त्याची गंभीर दखल घेतली.
जी-उत्तर विभागाच्या  सहाय्यक आयुक्तांनी महापौर व खासदार संजय राऊत यांना थेट नोटीस जारी केली आहे. ‘अत्यसंस्कारासाठी बांधलेला चबुतरा चौदा दिवसानंतरही काढलेला नाही तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र व मंडप बांधून त्याठिकाणी कायम स्वरुपी स्मारक उभारण्याची तयारी चालविल्याचे आपल्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे.
यामुळे आयुक्तांच्या आदेशाचा स्पष्ट भंग होत असून ही नोटीस मिळाल्यानंतर तात्काळ मंडप व चबुतरा काढून साफसफाई करावी अन्यथा महापालिका हा चबुतरा काढून टाकेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण वैयक्तिकरित्या जबाबदार रहाल.’ असा इशाराच या नोटिशीद्वारे देण्यात आल्याने आता हा चौथरा हटविण्यासाठी महापालिकेने पूर्ण तयारी केल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आता बाळासाहेबांचे अनुयायी दिलेला शब्द स्वतहून पाळणार का, आणि ते पाळणार नसतील तर शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार मिळालेले कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.