चीनमधून आयात केलेल्या ‘मावळा’ यंत्रांची जोडणी सुरू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गावरील प्रिन्सेस स्ट्रीट ते सागरी सेतूदरम्यानचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत समुद्रामध्ये भरणीचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कदरम्यान देशातील सर्वात मोठय़ा व्यासाच्या बोगद्याचे खोदकाम जानेवारीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. बोगद्यांच्या खोदकामासाठी चीनमधून आणलेल्या अजस्र ‘मावळा’ यंत्रांची जोडणी सुरू आहे. हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच नरिमन पॉइंट येथून पश्चिम उपनगरात झटपट पोहोचता यावे यासाठी मरिन ड्राइव्हजवळील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून कांदिवलीपर्यंत सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या १०.५८ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे बांधकाम मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क (४.०५ किमी), प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस (३.८२ किमी) आणि बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे दक्षिण टोक (२.७१ किमी) अशा तीन टप्प्यांत या मार्गाचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवारी पत्रकारांच्या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले होते. मात्र न्यायालयीन बाबी आणि करोनाच्या संसर्गामुळे काही प्रमाणात कामाला विलंब झाला. आतापर्यंत प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण झाले असून समुद्रात १११ हेक्टर क्षेत्रात भरणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत भरणी करून ६५ हेक्टर जमीन निर्माण करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण होईल, असा विश्वास सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी व्यक्त केला. या मार्गाच्या उभारणीसाठी एकूण खर्च १२००० कोटी असून प्रत्यक्ष रस्त्याच्या बांधणीवर आठ हजार ४२९ कोटी रुपये खर्च येणार आहे, असे निघोट यांनी सांगितले.

सर्वाधिक व्यासाचा बोगदा करणारे यंत्र

बोगद्याच्या खोदकामासाठी ‘मावळ’ यंत्राच्या जुळवणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रियदर्शनी पार्कजवळून या बोगद्याच्या खोदकामास सुरुवात करण्यात येणार आहे. यंत्र जुळवणीचे काम लवकरच पूर्ण होऊन जानेवारीत प्रत्यक्षात खोदकामाला सुरुवात होणार आहे.‘मावळ’ यंत्राच्या साह्य़ाने १२.२ मीटर व्यासाचे दोन बोगदे खोदण्यात येणार आहेत. या यंत्राचा व्यास सुमारे १२.१९ मीटर इतका असून बोगद्याचे खोदकाम करणारे देशातील हे सर्वाधिक व्यासाचे यंत्र आहे. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन मार्गिकांचा समावेश असणार आहे.

शहरात जाण्या-येण्यासाठी १८ वळणमार्ग

या मार्गावर १८ वळणमार्ग उभारण्यात येणार असून त्यात अमरसन गार्डन येथील चार, हाजी अली येथील आठ, तर वरळीतील सहा वळणमार्गाचा समावेश आहे. या वळणरस्त्यांची एकूण लांबी १५.३३ किमी असेल. त्यामुळे या मार्गावरून शहरातील अन्य भागात जाणे शक्य होईल.

१८०० वाहन क्षमतेचे चार भूमिगत वाहनतळ

अमरसन्स गार्डन (२०० वाहन क्षमता), हाजी अली (१२०० वाहन क्षमता) येथे प्रत्येकी एक आणि वरळी येथे दोन (प्रत्येकी २०० वाहन क्षमता) अशी एकूण चार भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावर बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिकेचाही समावेश असणार आहे.