News Flash

मुंबई-पुणे वगळता उद्योगचक्र सुरू होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राने देशाला अनेकदा दिशा दाखवली हा इतिहास आहे. आताही करोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात वैद्यकीय संशोधन सुरू झाल्याचे सूतोवाच करत प्लाजमा-बीसीजी उपचाराचा प्रयोग करण्याबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हे प्रयोग यशस्वी ठरल्यास महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त के ला. २० एप्रिलनंतर मुंबई-पुणे वगळता राज्यातील काही भागात काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणामार्फत  जनतेशी संवाद साधला. मुंबई-पुण्यात करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. ज्या नऊ-१० जिल्ह्य़ांत करोनाचा एकही रुग्ण नाही तेथे करोना पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. करोनाचा धोका नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर इतर उद्योग काही प्रमाणात सुरू करता येतील का,याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे. परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले.  करोनाशी राज्य सरकार लढा देत आहे. आरोग्य पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार करण्यात आला आहे. तसेच डॉ. रघुनाथ माशेलकर आणि इतर वैज्ञानिक-तंत्रज्ञांचाही गट तयार करण्यात आला आहे. करोनावर मात करण्याच्या दृष्टीने संशोधनही सुरू झाले आहे.  प्लाजमा तसेच बीसीजी उपचाराबाबत प्रयोग करण्यात येत असून त्याबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. हे प्रयोग यशस्वी ठरले तर महाराष्ट्र देशालाच नव्हे तर जगाला एक दिशा देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आरोग्याबरोबरच राज्यसमोर अर्थसंकटही मोठे आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गट नेमला आहे. त्याचबरोबर दीपक पारेख यांच्यासारखे उद्योजक,डॉ. विजय केळकर, अजित रानडे यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आदींचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

२९ जिल्ह्य़ांतील उद्योग सुरू करण्याचा विचार

अर्थचक्र सुरू करण्यासाठी मुंबई-पुण्यासारखे सात धोकादायक जिल्हे वगळून २९ जिल्ह्य़ांमध्ये उद्योग सुरू करण्याचा विचार असून त्याबाबतचा कृती आराखडा दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:46 am

Web Title: except mumbai pune the business cycle is likely to start abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कामागारांच्या टंचाईमुळे पायाभूत कामे रखडणार
2 सलून, पार्लरमधील कारागीर संकटात
3 रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करणार
Just Now!
X