प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाकरिता काही महाविद्यालयांकडून अवाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने माहिती पुस्तिका आणि अर्ज छापण्याचा महाविद्यालयाचा खर्च वाचला आहे. मग प्रवेश अर्जाचे शुल्क का कमी केले नाही, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

फोर्ट येथील ‘सेंट झेवियर्स’ महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन अर्ज नोंदणी शुल्क’ या नावाखाली ५०० रुपये भरावे लागल्याची तक्रार आहे. त्यावर ‘प्रवेशासाठी वापरली जाणारी संगणकीय प्रणाली विकत घ्यावी लागते. त्यासाठी खर्च येतो. विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात येतील तेव्हा त्यांना छापील माहिती पुस्तिका दिली जाणार आहे. शिवाय महाविद्यालयाने प्रवेशाबाबत समुपदेशनासाठी १५ समुपदेशक नेमले आहेत. आमच्या वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आणि नोकरी करून शिकणारे असतात. त्यांच्याकडून अशाप्रकारे अर्जासाठी शुल्क आकारले जात नाही. इतर विद्यार्थ्यांनी अर्जाचे ५०० रुपये शुल्क भरल्यामुळे आर्थिक समतोल राहतो. ज्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये भरणे शक्य नसेल त्यांनी मला पत्र लिहावे, उत्पन्नाचा दाखला दाखवावा. अशा विद्यार्थ्यांना शुल्क परत केले जाईल’, असा खुलासा महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी केला.

त्याचप्रमाणे ‘जय हिंद’ महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी ५०० रुपये आणि अनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५० रुपये शुल्क भरावे लागले. या संदर्भात प्राचार्य अशोक वाडिया यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची बाजू समजू शकली नाही. या प्रकरणी ‘आंबेडकर स्टुडण्ट्स असोसिएशन’चे सचिन मनवाडकर यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आणि विद्यापीठाला पत्र लिहिले आहे.

‘सेंट झेवियर्स’ आणि ‘जय हिंद’ या दोन्ही महाविद्यालयांमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास प्रत्येक महाविद्यालयाला लाखो रुपयांची कमाई मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश अर्जाचे शुल्क ५० रुपयांपेक्षा अधिक असू नये, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

‘ऑनलाइन प्रवेशासाठीही महाविद्यालयांना खर्च येतो. यासाठी नियमानुसार रक्कम आकारणे अपेक्षित आहे. याबाबत काय नियम आहेत हे माहिती घेऊन सांगतो’,  असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विनोद पाटील  म्हणाले.