शैलजा तिवले

करोना विषाणूपासून बचावासाठी स्वप्रेरणेने विविध काढय़ांचे प्रयोग आणि सतत गरम पाण्याचा शरीरात मारा केल्यामुळे घशाच्या आतील त्वचा भाजण्यापासून अल्सर, जळजळ आणि वेदना आदी तक्रारी अनेकांना जाणवत असल्याचे समोर येत आहे.

करोना संसर्गापासून बचावासाठी फेब्रुवारी – मार्च महिन्यापासून समाजमाध्यमांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांचे सल्ले देणाऱ्या संदेशांचे पेव फुटले. यातूनच मग करोना विषाणू नाकात आणि घशात काही काळ राहतात. तेव्हा गरम पाणी प्यायल्याने किंवा गरम वाफ घेतल्याने ते नष्ट होतात असा प्रचार सुरू झाला. याच्या पुढचा टप्प्यात विविध प्रकारच्या काढय़ांच्या जाहिरातींना उधाण आले. भर म्हणून एका संशोधन अभ्यासात उष्ण वातावरणात विषाणू टिकत नसल्याचे प्रसिद्ध झाले. त्यामुळे अनेकांनी गरम पाणी आणि काढय़ांचा दिवसभर मारा सुरू ठेवला. ज्याचे दुष्परिणाम आता जाणवत आहेत.

अति गरम पाणी आणि काढा घेतल्यामुळे घशात दुखायला लागते, जळजळ होते, अन्न गिळायला त्रास होतो. त्यात करोनाचीही साधारणपणे हीच लक्षणे असल्याने आपल्याला करोना झाला आहे का, अशी भीती लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील मानसिक ताणही वाढत असल्याचे दिसून आले. घशातील अल्सरचे प्रमाणही वाढत आहे. काही जणांनी तर ताप नाही पण बराच काळ घशात दुखते म्हणजे कर्करोग तर नाही ना, याचीही धास्ती घेतली होती. करोना नसूनही घशावर अत्याचार केल्याने घसादुखीचा त्रास असणारे आमच्याकडे जवळपास १० ते १५ टक्के रुग्ण येत असल्याचे कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी सांगितले.

घशामध्ये खवखव होत असल्यास आम्ही कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला देतो. कोमट पाण्याने त्या भागाचे रक्ताभिसरण वाढते. परंतु लोकांनी करोनाच्या भीतीने कडक गरम पाण्याचे सतत सेवन केले. त्यामुळे घशातील त्वचा जळाल्याचेही काही रुग्णांमध्ये आढळले. या रुग्णांना पुढील काही दिवस हे प्रकार  बंद करण्याच्या सूचना देतो. त्यानंतर हळूहळू या जखमा भरल्या जाऊन घसादुखी बंद होते, असे कूपर रुग्णालयाचे कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.

झाले काय?

समाजमाध्यमांवरील संदेशांचे अंधानुकरण करीत गरम पाण्याची वाफ कशी घ्यावी, याच्या चित्रफीतीपासून ते घरात गरम पाण्याचा थर्मासच जवळ सतत बाळगण्याच्या क्लृप्त्या लढविल्या गेल्या. विविध प्रकारच्या काढय़ांचा मारा आणि गरम पाण्याची वाफ यांमुळे करोनाचे विषाणू मरतील असा अनेकांचा समज झाला. पण त्यांच्या या प्रयोगांमुळे घशाचे नवे आजार निर्माण झाले.

हा तर गैरसमज..

विषाणू शरीरात शिरल्यावर घशाच्या त्वचेवर फार काळ राहत नाही. लगेचच तो पेशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे काढा, गरम पाण्याची वाफ किंवा गरम पाणी घेतल्याने विषाणूपासून प्रतिबंध होण्याबाबतचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तेव्हा या गैरसमजांना बळी पडू नये, असा सल्ला डॉ. भूमकर यांनी दिला आहे.