संगीत, सिनेमा, प्रसंगी मालिकाही भ्रमणध्वनीवर ‘हेडफोन’द्वारे पाहण्या-ऐकण्याच्या सवयीमुळे ऐन तरुणवयात बहिरेपणा येण्याची किंवा मेंदूंच्या नसांना धोका पोहोचण्याची शक्यता वाढते आहे. हेडफोनच्या अतिवापरामुळे कानावर सातत्याने अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत हेडफोनच्या वापरामुळे बहिरेपणा किंवा मेंदूला सूज येणे आदी प्रश्नांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या प्रमाणात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रस्त्यावर फिरताना कानात हेडफोन घालून संगीत ऐकण्याचे किंवा तासनतास बोलण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढते आहे. केईएम रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाच्या डॉ. निलिमा साठे यांनी गेल्या पाच वर्षांत मोबाइल आणि हेडफोनच्या वापरामुळे रुग्णांमध्ये बहिरेपणा किंवा मेंदूला सूज आल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. सतत फोनवरील संभाषणामुळे कान लाल होणे, कमी ऐकू येणे असे परिणाम दिसतात. डोकेदुखी, कानदुखी ही कानासंबंधित आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

मात्र ८० डेसिबलहून मोठय़ा आवाजाचे संगीत सातत्याने कानावर पडत असेल तर पुढे जाऊन बहिरेपणा किंवा मेंदूच्या नसांना धोका संभवतो. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका २० वर्षांच्या मुलाला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्या मेंदूला सूज आल्याचे दिसून आले. तासनतास हेडफोन कानात घालून गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे मेंदूच्या नसांवर ताण आला होता. सतत हेडफोनच्या वापरामुळे कानावर अतिरिक्त ताण येतो. मोबाईलमध्ये ८० डेसिबलपेक्षा मोठय़ा आवाजात संगीत ऐकणे कानाच्या आरोग्यासाठी योग्य नाही, असे वोकहार्ड रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. नयन शेट्टी यांनी सांगितले.