काही दिवसांपासून रिपरिपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने रविवारी मुंबईसह उपनगरातील बाजार गर्दीने फुलून गेले. दिवाळीवर पावसाचे मळभ असल्याने खरेदीचा उत्साह मावळला होता, पण रविवारची सुट्टी साधून अनेकांनी पाडवा, भाऊबिजेसाठी सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली.

मुंबईसह उपनगरात आठवडय़ापासून पावसाची संततधार सुरू होती. परिणामी दिवाळी असूनही मुंबई, ठाणे, कल्याण आणि आसपासच्या भागांतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतली आणि लोकांनी बाजारपेठा गाठल्या. अनेक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. दक्षिण मुंबईतील घाऊक बाजारपेठांमध्ये गर्दी होती. दादरच्या बाजारातील रस्तेही गर्दीने वाहत होते. मंगळवारच्या भाऊबिजेच्या निमित्ताने कपडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. साडय़ा, पंजाबी ड्रेस, कुर्तीज, शर्ट, पँट याबरोबरच हेडफोन, स्पीकर, पेन ड्राइव्ह अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही जोरदार विक्री झाल्याचे दादरच्या दुकानदारांनी सांगितले.

दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीच कंदील, दिवे, पणत्या, रांगोळी, उटणे आणि पूजेच्या साहित्याची विक्री सुरू होते; परंतु पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. यापैकी अनेक वस्तूंची विक्री पदपथांवर होते; परंतु पावसामुळे त्यांना विक्री करता आली नाही. उलट काहींचे नुकसान झाले. पावसामुळे कंदील आणि रांगोळीचे रंग भिजल्याने पाच हजारांचे नुकसान झाल्याचे दादर येथील राजू सिंग या विक्रेत्याने सांगितले. मात्र, शनिवारी सायंकाळी पाऊस ओसरल्यानंतर आणि रविवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चांगली विक्री झाल्याचे सिंग यांनी सांगितले.

सुवर्णखरेदीत घट

‘‘धनत्रयोदशीला सोन्याची चांगली विक्री झाली, मात्र लक्ष्मीपूजनाला तुलनेने त्यात घट झाली.’’ गेल्या दिवाळीपेक्षा यंदा सोन्याची खरेदी २० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे ‘जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी काऊन्सिल’चे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले. यंदा ग्राहक सोने खरेदी करण्याकरिता हात आखडता घेत असल्याचे ते म्हणाले. आर्थिक मंदीचा परिणाम सोने खरेदीवरही दिसत असला तरी धनत्रयोदशीच्या दिवशी तुलनेने बरी विक्री झाल्याचे काही दागिने विक्रेत्यांनी सांगितले. सध्या सोन्याचा भाव ३९ हजार प्रति तोळा आहे.

फुलांचे भाव चढेच 

दिवाळीत फुलांना मोठी मागणी असल्याने चढय़ा भावाने त्यांची विक्री केली गेली. संततधार पावसामुळेही फुले भिजून खराब झाल्याने विक्रेत्यांना ती फेकून द्यावी लागली. गेल्या आठवडय़ापर्यंत झेंडू, शेवंती, अष्टर, गुलछडी यांचा प्रतिकिलोचा दर सुमारे १०० रुपये होता. रविवारी तो दुप्पट होऊन २०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे फुले विक्रेत्यांनी सांगितले.