News Flash

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोप निश्चित

३० सप्टेंबर रोजी न्यायालयात सरकार तसेच बचाव पक्षाकडून पुराव्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोप निश्चित

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींविरोधात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी बुधवारी दोषारोप निश्चित केले. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयात सांगितले. आरोप निश्चितीमुळे खटल्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (१५ सप्टेंबर) दूरदृश्य सुविधेद्वारे (व्हिडीओ कॉन्फरसिंग) झाली. आरोपी डॉ. तावडे येरवडा कारागृहातून, कळसकर ऑर्थर रोड कारागृहातून, अंदुरे औरंगाबाद कारागृहातून सुनावणीस हजर झाले. आरोपी भावे, अ‍ॅड. पुनाळेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते न्यायालयात हजर होते. न्यायालयाने आरोपींकडे गुन्हा कबूल आहे का, अशी विचारणा केली. त्या वेळी पाचही आरोपींनी गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले. आरोपींनी न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली. मात्र न्यायालयाने आरोप निश्चितीस आणखी मुदतवाढ देता येणार नाही, असे स्पष्ट केले.

या प्रकरणात ३० सप्टेंबर रोजी न्यायालयात सरकार तसेच बचाव पक्षाकडून पुराव्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. या प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या विरोधात पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डॉ. तावडे, कळसकर, अंदुरे, भावे यांच्या विरोधात खून, कट रचणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलम १५, १६ नुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी काम पाहत आहेत. आरोपींकडून अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर काम पाहत आहेत.

आरोपींना येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक आरोपी येरवडा कारागृहात आहे. दोन आरोपी औरंगाबाद, ऑर्थर रोड कारागृहात आहेत. दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर खटल्याची सुनावणी लवकर होऊ शकते. आरोपींना एकाच कारागृहात ठेवल्यास त्यांना सुनावणीसाठी हजर करणे शक्य होईल. त्यांना वकील आणि कुटुंबीयांबरोबर संपर्क साधता येईल. त्यामुळे या प्रकरणातील अंदुरे, कळसकर यांना येरवडा कारागृहात हलवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. आरोपींनी कोणतेही दडपण न घेता त्यांच्या वकिलांबरोबर बोलावे, असे न्यायालयाने सांगितले. गुन्ह्याबाबतची कागदपत्रे, पुरावे सरकार पक्षाकडून सादर करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष या खटल्याची सुनावणी सुरू होईल.

तपास असा…

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी  विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. संशयित आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्या वेळी मोबाइल संभाषण तसेच ई-मेल पडताळण्यात आले होते. २ सप्टेंबर २०१३ रोजी संशयित हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. त्या वेळी १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ९ मे २०१४ रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी शरद कळसकरने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

मुदतवाढीची मागणी…

या प्रकरणातील आरोपींनी आरोप निश्चितीस मुदतवाढ मागितली. गेली पाच वर्षे मी कारागृहात आहे. करोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबीय तसेच वकिलांशी संपर्क साधता आला नाही. काही गोष्टींमुळे मला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याची विनंती आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने न्यायालयात केली. माझी मानसिक स्थिती ठीक नाही. आरोप निश्चितीस आणखी वेळ वाढवून द्यावी. दुसऱ्या गुन्ह्यात मला अडकवले तर मी काय करू? असे आरोपी शरद कळसकरने न्यायालयात सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 1:22 am

Web Title: executive chairman of maharashtra anti superstition committee dr narendra dabholkar murder case akp 94
Next Stories
1 ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे राज्यभरात आंदोलन
2 अध्यादेशाचा निवडणुकांवर परिणाम नाही
3 संशयित दहशतवादी शेख धारावीचा रहिवासी
Just Now!
X