संचारबंदीच्या काळात गृहसेविका, स्वयंपाकी, वाहनचालक, सुश्रूषा करणारे कर्मचारी आदींना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री आठपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संचारबंदीत सूट देण्यात आली आहे. त्याबरोबरच गृहसेविका, स्वयंपाकी, वाहनचालक, घरी जाऊन सुश्रूषा करणारे कर्मचारी यांनाही संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. या सर्व घटकांना संचारबंदीच्या काळात प्रवास करता येईल.

राज्य सरकारने लागू के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गृहसेविका, स्वयंपाकी, वाहनचालक आदींना सूट देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनास दिले आहेत. मुंबई तसेच ठाणे महापालिकांनी या सेवेतील कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळात ये-जा करण्यास परवानगी दिली आहे. पुणे वा अन्य शहरांमध्येही या सेवेतील कर्मचाऱ्यांना आडकाठी के ली जाणार नाही. फक्त प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवेश करता येणार नाही.

राज्य सरकारचा आदेश लागू झाल्यावर गृहसेविका, वाहनचालक, स्वयंपाकी आदींना घरी काम करण्यासाठी येता येईल का, याची बुधवारी दिवसभर चर्चा होती. समाजमाध्यमांवर या संदर्भातील प्रश्न विचारले जात होते. मुंबई व ठाणे महानगरपालिकांनी या सेवेतील कर्मचाऱ्यांना संचारबंदीतून सूट दिल्याचे स्पष्ट केले. अन्य शहरांमध्येही या सेवेतील कर्मचाऱ्यांना अडवू नये, अशाच सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.