साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. गणित-विज्ञानातील अनेक गृहीतके, प्रमेय, प्रयोग सहजसोप्या पद्धतीने मांडणाऱ्या नेहरू विज्ञान केंद्रातील प्रदर्शनात इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला या भूमितीतील संकल्पना मांडल्या होत्या. त्रिमितीय स्वरूपातील इलिप्स, पॅराबोला पाहिले आणि महाविद्यालयात शिकलेल्या या त्रिकुटाचे कोडे अचानक उलगडले. कितीही कल्पनाशक्ती लढवली तरी पुस्तकातील द्विमितीत अडकलेल्या या कोनीय त्रिकुटाचा ठाव लागला नव्हता. पण त्रिमितीत पाहिले तेव्हा, ‘अरेच्चा, हे असे होते तर..’ असे वाटले. असाच अनुभव जरा वेगळ्या संदर्भात गेल्या आठवडय़ात आला. नरिमन पॉइंटला एअर इंडियाच्या इमारतीसमोर, समुद्राच्या वाऱ्यांवर डोलणारे ते झाड गेली तीन वर्षे खुणावत होते. तीन मजली उंची गाठलेले. साधारण आंब्याच्या पानांसारखा आकार असलेली पाने. पण आंब्यासारखा घेर नाही. पाऊस सरता सरता पोपटी, हिरवट रंगांच्या पिटुकल्या फुलांच्या झुबक्यांनी झाड भरून जाते. हे पाहिलेय कुठे तरी, नेहमीचेच आहे असे सतत वाटत होते. पण काही ना काही कारणाने त्याची ओळख पटवणे मात्र राहून जात होते. मागच्या आठवडय़ात अंगोपांगी पूर्ण बहरलेल्या त्या झाडाकडे नजर गेली आणि मग मात्र मोबाइलवर त्याची छबी काढून ओळख पटवण्यासाठी एका वनस्पतीतज्ज्ञांकडे पाठवली. अरे, हे तर सातवीण.. त्यांचा प्रतिसाद आला.

साक्षात्कार व्हावा तसे डोळे लकाकले. अनेकदा पुस्तकात, चर्चामध्ये ऐकलेले हेच ते सातवीणीचे झाड. दुर्मीळ नाही. मुंबईत अनेक ठिकाणी आहे. पण तरीही कधी ‘हेच सातवीण!’ असे लक्षात नव्हते आले. पळसाला जशी तीन पाने असतात तशी या झाडाला सात पानांच्या घेरात फुले येतात. त्यामुळे त्याला सप्तपर्णी किंवा सातवीण म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन त्याला सैतान असेही नाव पडले. अपभ्रंशावरून नावाचा अर्थ पार बदलण्याचे हे मासलेवाईक उदाहरण. तर या सातवीणीची झाडे मुंबईच्या अनेक गल्ल्यांमध्ये सहजी दिसतात. मंत्रालयापासून एअर इंडियापर्यंत एका ओळीत एकमेकांच्या सोबतीने सातवीणीची झाडे उभी आहेत. पावसाळा संपता संपता या झाडांना हलका पिवळा-हिरवट रंग असलेली फुले येऊ लागतात आणि महिनाभरात संपूर्ण झाड बहराला येते. पानांच्या हिरव्यागार रंगात खरे तर ही फुले उठून दिसणार नाहीत. मात्र फुलांच्या गुच्छांनी डवरलेले झाड लांबून पाहिले की हिरव्या रंगछटांमधील सौंदर्य समजते. या झाडाच्या खालून जाताना फुलांच्या गालिचासोबत त्यांचा सुगंधही लक्षात राहतो.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ

सातवीणीचे हे झाड लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा बहराचा काळ. आपल्याकडे साधारण थंडीत म्हणजे डिसेंबर-जानेवारीत पानगळ सुरू होते. त्यानंतर नवी पालवी व त्यापाठोपाठ फुले येण्यास सुरुवात होते. वसंतात, गुढीपाडव्याच्या दरम्यान, मार्चमध्ये बहुतांश झाडे बहरण्यास सुरुवात होते. तामण, पळस, पांगारा, काटेसावर, बहावा अशी बरीचशी झाडे मार्च ते जूनमध्ये फुलांचे सडे शिंपडतात. काही झाडे मात्र त्याला अपवाद आहेत. पाऊस सुरू असतानाच ही झाडे बहरू लागतात. हा बहर डिसेंबपर्यंत सुरू राहतो. त्यामुळे ऐन दिवाळीत शहराच्या रस्त्यांवर या झाडांच्या फुलांची रांगोळी पसरलेली असते. सातवीण हा या झाडांमधील प्रामुख्याने लक्षात येणारे झाड. पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सातवीण बहरायला सुरुवात होते. या दिवसात गुलमोहोरालाही फुले दिसतात. तसा गुलमोहोराला मे महिन्याच्या अखेरीस बहर येतो. शहरातील अनेक गुलमोहोरांना पावसाळाभर बहर राहतो आणि डिसेंबपर्यंत ही लालचुटुक फुले दिसत राहतात. सातवीणीप्रमाणेच चेंडूसारखी फुले असलेला चेंडूफूलही आता बहरला आहे. हिरव्या रंगाची चेंडूफुले पायाखाली येऊन चिरडली जात असल्याने अनेक सोसायटय़ांमध्ये अस्वच्छतेच्या कारणासाठी तो लावला जात नाही. मात्र वड, पिंपळांच्या सोबतीने दक्षिण मुंबईत चेंडूफूलही अनेक ठिकाणी दिसतो. फूल पाहिले की कोणालाही हे झाड चटकन ओळखता येते. ऑस्ट्रेलियन चेस्टनट हा केशरी रंगाची फुले असलेला दुर्मीळ वृक्षही सध्या बहरलाय. भायखळ्याच्या राणीच्या बागेत हे झाड आहे. लाकडासाठी प्रसिद्ध असलेला आणि सरळसोट वाढणाऱ्या सागालाही याच काळात फुले येतात.

बागेत दिसणारा देशी बदामही डिसेंबपर्यंत बहरणार. त्यानंतर त्याच्या तळहाताएवढय़ा मोठय़ा बिया खाली पडलेल्या दिसतील. देशी बदामाची एक आठवण म्हणजे या वेळची शहराची वृक्षगणनेला गेल्या वर्षी सुरुवात झाली तेव्हा गणनेतील पहिले झाड हे ओव्हल मैदानातील देशी बदामाचे होते. हरडा, बेहडा, काशिद ही झाडेही याच रांगेतील. अर्थात मार्च ते मे महिन्यात फुलणाऱ्या झाडांप्रमाणे लालचुटुक, गडद गुलाबी, पिवळाधम्मक अशा चमकदार फुलांचा हा काळ नाही. उन्हात चमकणाऱ्या, कीटकांना आकर्षित करून घेणाऱ्या फुलांऐवजी हिरव्या, पिवळसर अशा हलक्या रंगांच्या फुलांचा हा मोसम आहे.

prajakta.kasale@expressindia.com