पृथ्वी आणि अवकाश यांचा मिलाफ दाखवणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन

मुंबई : हौशी खगोल अभ्यासकांनी टिपलेल्या अवकाश छायाचित्रांचे प्रदर्शन सध्या नेहरू सेंटर येथे सुरू आहे. पृथ्वी आणि अवकाश यांचा मिलाफ दाखवणारी छायाचित्रे या प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन २ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. अवकाशातील जगाविषयी सामान्य माणसामध्ये विशेषत लहान मुलांमध्ये प्रचंड कुतूहल असते. ते शमवण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

यात अवकाशातील ग्रह-नक्षत्रांची युती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, इत्यादी घटनांची छायाचित्रे आहेत. ग्रहणाच्या दिवशी बदलत जाणारी सूर्यकला एका रेषेत एकाच छायाचित्रात पाहायला मिळते. रात्र काळोखी असते हा समज खोटा ठरवणारे एक छायाचित्र येथे आहे. यात अंधाराला उजळवून टाकणारा काजव्यांचा प्रकाश टिपला आहे. ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ने  (आयएसएस) चंद्रासमोरून मार्गक्रमण केले. त्याचे छायाचित्र मंदार पोतदार यांनी पुणे येथून ५१० किमी अंतरावरून टिपले आहे. ही घटना केवळ ०.५ सेकंदांत घडली होती.

प्रदर्शनातील काही छायाचित्रे कॅमेऱ्याने टिपलेली आहेत, तर काही दुर्बिणीला क ॅमेरा लावून टिपण्यात आली आहेत. आकाशगंगेचे विविध बाजूंनी दर्शन घडवणारी छायाचित्रेही प्रदर्शनात आहेत. चर्चच्या मागून होणारा चंद्रोदय, गेट वे ऑफ इंडियाच्या मागे पसरलेले विस्तीर्ण आकाश, तारे आणि धुलिकणांनी भरलेल्या आकाशात दिसणारा घोडा, झाडाच्या भोवताली दिसणारे अवकाश, इत्यादी छायाचित्रांमधून छायाचित्रकारांची सौंदर्यदृष्टी दिसून येते. धूळ, हायड्रोजन, हेलियम व आयनित वायूंपासून बनलेल्या तेजोमेघांची छायाचित्रेही येथे पाहायला मिळतील.