दिशा खातू

लहान मुलांमधील वाचनसंस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

बाल दिनाचा उत्साह दरवर्षी वाढत असला तरी मराठीतील खास बच्चेकंपनीसाठीची नियतकालिक संस्कृती लोप होण्याच्या मार्गावर आहे. मराठीतील ‘चांदोबा’, ‘ठकठक’ ही एके काळी प्रचंड मागणी व खप असलेली बाल नियतकालिके बंद पडली असून ‘चंपक’, ‘किशोर’सारख्या सध्या सुरू असलेल्या नियतकालिकांनाही आपले विपणनाचे गणित जुळविताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे या नियतकालिकांच्या खपाला ओहोटी लागल्याचे चित्र आहे.

सध्या मराठी बाल नियतकालिकांच्या बाजारात ‘किशोर’, ‘मुलांचे मासिक’, ‘वयम’ इत्यादी मासिके नियमितपणे येत असल्याचे वितरक हेमंत बागवे यांनी सांगितले. कागदाच्या वाढलेल्या किमती तसेच छपाईसाठी लागणारी यंत्रणा महाग झाली आहे. त्यात बालवाचकांकडून मराठी नियतकालिकांना फारशी मागणी नसल्याने जाहिराती मिळण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बाल नियतकालिके काढणे परवडेनासे झाले आहे. मराठी ‘चंपक’ पूर्वी संपूर्ण ग्लॉसी रूपात येत होते. आता त्याचा खर्च परवडेनासा झाल्याने तो साध्या कागदावर छापला जात आहे. खर्चाला कात्री लावण्याकरिता मराठी ‘चंपक’ची काही पाने कृष्णधवल रंगात छापली जातात. इतके करूनही ‘चंपक’ बाजारातही कुठे दिसून येत नाही, अशी पुस्ती बागवे यांनी जोडली.

एके काळी मराठीत बालमासिकांचा खप चांगलाच होता. मानकर काका यांनी तर ‘टॉनिक’ या नियतकालिकाचे रूपांतर थेट बालदैनिकात केले होते. मात्र त्यांचे आर्थिक गणित फसले आणि त्यांच्या निधनानंतर ‘टॉनिक’ बंदच पडले.

राज्यात काही बाल मासिके निघतात; पण ती सर्वत्र पोहोचत नाहीत. पुस्तकांच्या दुकानांत किंवा वर्तमानपत्रांच्या स्टॉलवर तर बाल मासिके  शोधून सापडत नाहीत. मुळातच मागणी नसल्यामुळे बुक स्टॉल, पुस्तकांचे दुकानदारही मासिके ठेवत नाहीत, असे वितरकांनी सांगितले. त्यातल्या त्यात ‘किशोर’ला चांगली मागणी आहे. ‘‘अनेक बाल मासिके बंद पडत आहेत ही सत्यस्थिती आहे. आम्ही काळानुरूप बदल केले. ‘किशोर’ ई स्वरूपात आणला. त्यातील कथा, कथांची मांडणी, चित्रे बदलली. फक्त शहरांतील मुलांनाच लक्ष्य न करता ग्रामीण भागांचाही विचार केला. त्यामुळे टिकून राहता आले आहे,’’ अशा शब्दांत कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी ‘किशोर’च्या लोकप्रियतेमागील कारणे मांडली. ‘किशोर’चा अपवाद वगळता इतर बाल नियतकालिकांबाबत मात्र आनंदीआनंद आहे. ‘‘बाल नियतकालिके दिसत नाहीतच. शिवाय मराठी बाल साहित्यालाही मागणी नाही. त्यामुळे ‘मराठी बालवाङ्मय’ हा प्रकारच नामशेष होतो की काय,’’ अशी भीती ‘आयडियल बुक डेपो’चे मंदार नेरुरकर यांनी व्यक्त केली.

इतिहास आणि वर्तमान

मराठीत बाल नियतकालिकांची दीर्घ परंपरा आहे. १८७२ साली सर्वप्रथम मराठीमध्ये ‘बालबोध मेवा’ नावाचे मासिक सुरू झाले होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक बाल नियतकालिकांना सुरुवात झाली होती. मराठीत ‘खेळगडी’, ‘शाळापत्रक’, ‘बालमित्र’, ‘बालोद्यान’, ‘सचित्र बालमासिक’, ‘मुलांचे मासिक’, ‘गोकुळ’, ‘फुलबाग’, ‘बालवीर’, ‘गंमत’, ‘गंमत-जंमत’, ‘आनंदवन’, ‘टुणटुणनगरी’, ‘बिरबल’, ‘टारझन’, ‘क्रीडांगण’, ‘किशोर’, ‘छावा’, ‘ठकठक’, ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘कुमार’, ‘टॉनिक’, ‘रानवार’, ‘विज्ञानयुग’ इत्यादी साप्ताहिके आणि मासिके सुरू होती; परंतु यातील एखाददुसरे नियतकालिकच सुरू आहे. मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली ‘चांदोबा’ आणि ‘ठकठक’ ही मासिकेही बंद झाली आहेत. काही नावापुरती सुरू आहेत, तर काहींनी इंग्रजी, हिंदी या सर्वाधिक खपाच्या आवृत्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मराठी नियतकालिके दुर्लक्षित आहेत.

बाल दिवाळी अंकही घटले

दिवाळी अंकांची परंपरा बाल दिवाळी अंकांमध्येही जपली जाते. काही वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात लहान मुलांसाठीचे दिवाळी अंक निघत होते. मात्र बाल नियतकालिकांप्रमाणे बाल दिवाळी अंकही कमी झाले आहेत. सध्या केवळ ‘बाल मैफिल’, ‘किशोर’, ‘वयम्’, ‘छोटय़ांचा आवाज’, ‘मुलांचे मासिक’, ‘गंमतजंमत’ आणि ‘बाल रंजन’ इत्यादी लहान मुलांचे दिवाळी अंक बाजारात उपलब्ध असल्याचे मुद्रा बुक डेपोचे संचालक राजू नाईक यांनी सांगितले. आधीच्या अंकांच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे, असे त्यांनी सांगितले.

मुले वाचत नाहीत. याचे कारण मुलांचे पालकच वाचत नाहीत. मराठी बालसाहित्याला मागणी नसल्यामुळे अनेक लेखक मोठय़ांच्या मासिकांत किंवा इतर माध्यमांत लेखन करू लागले आहेत.

– राजीव तांबे, बाल साहित्यिक

धोक्याची घंटा

मुलांचे कमी झालेले वाचन, इंग्रजी माध्यमाचे वाढते प्रस्थ, मनोरंजनासाठी भ्रमणध्वनी, संगणक अशा इतर मार्गाचे वाढते आकर्षण यांचा फटका मराठी बाल नियतकालिकांना बसतो आहे. मागणीचे गणित बिघडल्याने बाल नियतकालिकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. त्यामुळे अनेकांनी आपापली नियतकालिके गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.