19 March 2019

News Flash

राणीच्या बागेत येणार वाघ, सिंह, नीलगायीसह अनेक नवे पाहुणे

पेंग्विनला मिळालेल्या प्रतिसादानंतर महापालिकेचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

मुंबईत लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेली बाग म्हणजे राणीची बाग. या बागेची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली. मात्र पेंग्विन आणले गेल्यापासून या बागेला बच्चेकंपनीसह इतर मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पेंग्विनना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता मुंबई महापालिकेने आणखी काही प्राणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुमारे १२० कोटी रुपये खर्चून प्राणी संग्रहालयाचे नुतनीकरण करण्याचे कामही सुरुच आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५५ ते ६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सिंगापूरच्या झेराँग पार्कप्रमाणेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. २०१९ च्या शेवटापर्यंत या बागेचे नुतनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या बागेत आता वाघ, सिंह, बारशिंग हरीण, नीलगाय, पाणमांजर असे नवे प्राणीही आणले जाण्याची शक्यता आहे. बागेत सध्या १७ प्रकारचे पिंजरे बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या दीड वर्षात राणीच्या बागेचे बदललेले स्वरूप मुंबईकरांना बघायला मिळू शकते.

खरे तर राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यानंतर त्यातील एक पेंग्विनचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणावरून शिवसेनेवर चांगलीच टीका झाली. मात्र पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे टीकाकारांचे तोंड बंद झाले आहे. अशात आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकेने राणीच्या बागेचे रूप पालटण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण कोणते प्राणी आणले जाणार?

सिंह, वाघ, बारशिंग हरीण, नीलगाय. तरस, सांबर, काळवीट, कोल्हा , कासव आणि विविध पक्षी आणले जातील

सध्याच्या घडीला या उद्यानात ३५० प्राणी आहेत, तसेच ८ पेंग्विनचाही यात समावेश आहे. नोव्हेंबर २०१८ ला दुसरा टप्पा सुरु होईल आणि २०१९ च्या डिसेंबरपर्यंत संपेल. राणीच्या बागेत १८९० मध्ये लँडस्केप गार्डन उभारण्यात आले. या गार्डनचेही नुतनीकरण केले जाणार आहे. ‘द हिंदू’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली जाणार आहे. तसेच प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जाही आणखी चांगला केला जाणार आहे असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुरक्षा रक्षकांसाठी एक वेगळी खोली बांधली जाईल. तसेच या बागेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

First Published on March 13, 2018 3:31 am

Web Title: expect new better animal enclosures at byculla zoo in mumbai by end of 2019