प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे रस्ते विकास महामंडळास आदेश
मुंबई : वांद्रे—वर्सोवा आणि वर्सोवा—विरार हे दोन्ही सागरी सेतू मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुखकर प्रवास होण्यासाठी अत्यंत महत्वाचे असून त्यांच्या कामांना गती द्यावी. निर्धारित वेळेत हे प्रकल्प पूर्ण करावेत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्य रस्ते विकास महामंडळास दिले.
रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ‘वर्षां’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या दोन प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू ९.६ किमी लांबीचा असून या मार्गामुळे वाहतूककोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे, तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र करोनामुळे आता हा प्रकल्प २०२५मध्ये पूर्ण होईल. जुहू कोळीवाडा बा मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना ठाकरे यांनी यावेळी केली.
वर्सोवा—विरार या सुमारे ४२.७५ किमी लांबीच्या आणि ३२ हजार कोटी रूपये खर्चाच्या सागरी मार्गाचा पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.
वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असून रोजगार संधी वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी हे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.
मच्छीमारांसाठी सुविधा
वर्सोवा—विरार हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरणविषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असून मच्छीमारांच्या हालचालींना हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छीमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 3:07 am