News Flash

१७ हजार ६९३ रुपयांना एक खड्डा

गेल्या वर्षी पालिकेला एक खड्डा बुजविण्यास तब्बल १७ हजार ६९३ रुपये मोजावे लागले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील रस्त्यांच्या डागडुजीवर वारेमाप खर्च; तब्बल आठ कोटी खर्चूनही खड्डय़ांचा प्रश्न ‘जैसे थे’

मुंबईतील रस्त्यांवर २०१८-१९ मध्ये पावसाच्या तडाख्यात पडलेले तब्बल ४,८९८ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील सात कोटी ९८ लाख ७ रुपये खर्चूनही पावसाळ्यात खड्डय़ांच्या त्रासातून वाहनचालक व पादचाऱ्यांची मुक्तता झालेली नाही. खड्डय़ांची संख्या आणि खर्च पाहता गेल्या वर्षी पालिकेला एक खड्डा बुजविण्यास तब्बल १७ हजार ६९३ रुपये मोजावे लागले आहेत.

इतका खर्च करूनही प्रत्येक पावसाळ्यात खड्डय़ांची समस्या कायम असल्याने पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि ते बुजविण्यासाठी येणारा खर्च पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांना नवे नाहीत. मात्र या खड्डय़ांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचबरोबर वाहतुकीवरही परिणाम होतो. खड्डय़ांमुळे छोटय़ा-मोठय़ा अपघातांचेही प्रमाण वाढते. मुंबईमधील रस्त्यांवर २०१७-१८ या वर्षांमध्ये पडलेले तब्बल ३,९८१ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीमधील सात कोटी ७३ लाख २२ रुपये खर्च झाले. तसेच २०१८-१९ मध्ये मुंबईतील रस्त्यांवर ४,८९८ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला सात कोटी ९८ लाख ७ रुपये खर्च करावे लागले, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उजेडात आली आहे. ही आकडेवारी  लक्षात घेता २०१८-१९ या वर्षांत एक खड्डा बुजविण्यासाठी पालिकेला १७ हजार ६९३ रुपये खर्च आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. १० जून ते १ ऑगस्ट २०१९ या काळात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांविषयी पालिकेकडे २,६४८ तक्रारी आल्या होत्या. यापैकी २,३३४ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. माहितीच्या अधिकारात हाती आलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते ३१ जुलै २०१९ या काळात पालिकेला खड्डय़ांबाबत २,६६१ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २,४६२ तक्रारींचे निवारण करण्यात आले. तर केवळ १९९ तक्रारींचे अद्याप निराकरण करण्यात आलेले नाही.

खड्डय़ांची नेमकी संख्या गुलदस्त्यात

२०१३ ते ३१ जुलै २०१९ या काळात मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांविषयी पालिकेला २४,१४६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २३,३८८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. १० जून ते १ ऑगस्ट २०१९ या काळात २,६४८ पैकी २,३३४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. केवळ ४१४ तक्रारींचे निराकरण झालेले नाही. त्यामुळे आजघडीला मुंबईत किती खड्डे आहेत हा मुद्दा गुलदस्त्यातच आहे.

सहा वर्षांत १७५ कोटी खड्डय़ांत

२०१३ ते २०१९  या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने एकूण १७५ कोटी ५१ लाख  ८६ हजार रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी एकूण ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार रुपये खर्च करून प्रशासनाने खड्डे बुजविले. मात्र वारंवार रस्त्यांवर खड्डे पडत असून त्याचा नागरिक आणि वाहतुकीला प्रचंड फटका पडत आहे. एकीकडे पावसाळ्यात खड्डेमय होणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 1:07 am

Web Title: expenditure on street porthole in mumbai abn 97
Next Stories
1 एक हजार गणेश मंडपांना परवानगीची प्रतीक्षा
2 पहिलेवहिले मियावाकी उद्यान वरळीत
3 सिलिंडर स्फोटप्रकरणी गॅस कंपनीला दहा लाखांचा दंड
Just Now!
X