27 May 2020

News Flash

वेळीच सावध झालो अन् धोका टळला!

करोनामुक्त झालेल्या मुंबईतील तरुणाचा अनुभव

संग्रहित छायाचित्र

डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. सुरुवातीपासूनच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळेच तीन वर्षांच्या मुलापासून ते ६५ वर्षांच्या आईपर्यंत कुटुंबातील सदस्यांपुढील संसर्गाचा धोका टळला, अशी प्रतिक्रिया करोनामुक्त झालेले कांदिवली येथील हर्ष वजानी (३६) यांनी व्यक्त केली. अवघ्या पाच दिवसांत रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन ते घरी परतले आहेत.

सुरुवातीला अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांकडून औषध घेतले. त्यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुटुंबातील सदस्यांपासून अंतर ठेवून राहण्यास सांगितले. सुरुवातीला फारशी लक्षणे दिसत नसतानाही मी वेगळ्या खोलीत झोपायचो. माझे कपडे, जेवणाची भांडीही वेगळी होती. मात्र, पाच दिवसानंतरही त्रास कमी न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने करोनाची चाचणी केली. त्यात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, असे हर्ष यांनी सांगितले.

रिलायन्स फाऊंडेशनकडून सेव्हन हिल्समध्ये सुरू केलेल्या रुग्णालयात दाखल झालो. मात्र, कुटुंबाच्या धास्तीने प्रचंड तणावाखाली होतो. डॉक्टरांनी समजूत काढली. कुटुंबातल्या अन्य तिघांच्याही करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्यांना लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मी अर्धी लढाई जिंकली. दुसऱ्याच दिवसापासून माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली, असा अनुभव हर्ष यांनी सांगितला. सकस आहार आणि उपचारामुळे पाच दिवसांतच माझ्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्या. पाच दिवसांनी मी घरी परतल्यानंतर घरच्यांसह इमारतीतील रहिवाशांनाही सुखद धक्का बसला. इमारतीच्या प्रवेशद्वारातच टाळ्यांच्या गजरात त्यांनी माझे स्वागत केले. हा एक वेगळा अनुभव होता, असे हर्ष यांनी आवर्जून नमूद केले. परिचारिकांसह डॉक्टरांच्या कामाबद्दल कौतुक व्यक्त करतानाच हर्ष यांनी या सर्वाचे आभार मानले.

संसर्गाचे कारण अस्पष्ट

हर्ष यांना संसर्ग कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकडे त्यांनी परदेश प्रवासही केलेला नव्हता. मात्र, देशभरात टाळेबंदी जाहीर केल्याच्या दिवशीच तातडीच्या कामासाठी हर्ष यांना कार्यालयात जावे लागले. या प्रवासातच संसर्ग झाला असावा, अशी शक्यता हर्ष यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:41 am

Web Title: experience of a youth in mumbai corona free abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू
2 ‘आयआयटी’ मुंबईमध्ये औषधावर संशोधन
3 ग्रामसेवकांना २५ लाखांचे विमा संरक्षण
Just Now!
X