‘लोकसत्ता आरोग्यभान’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : समाजमाध्यमांमधून ‘व्हायरल’ होणारे आरोग्यविषयक सल्ले किंवा सध्या प्रचार होत असलेल्या विविध आहार पद्धती (डाएट पॅटर्न) यांचा आंधळेपणाने अवलंब करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. अन्यथा वजन नियंत्रणाचा दावा करणाऱ्या फसव्या पद्धती शरीराला दुष्परिणामकारक ठरू शकतात, असा सूर ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या माटुंगा येथील ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर’मध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात उमटला.

‘थायरोकेअर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या कार्यक्रमात ‘लीना मोगरेज् फिटनेस’च्या संचालिका आणि फिटनेसतज्ज्ञ लीना मोगरे, आहारतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी, बालरोगतज्ज्ञ व भावनिक बुद्धिमत्ता विशेषतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर या तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘परांजपे अथश्री’ व ‘पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजन’ आहेत. हिलिंग पार्टनर ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ आहेत.

बदलत्या जीवनशैलीचे आहारावर झालेले परिणाम सांगताना डॉ. वैशाली जोशी म्हणाल्या, ‘फास्ट फूडची उपलब्धता वाढली आहे. शिवाय ते खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे जीवनशैलीत अनेक वाईट बदल घडले आहेत. यामुळे काय खावे आणि कधी खावे यावरील ताबा सुटला आहे. अशा आहारातून सर्व घटक मिळत नाहीत, म्हणून मग जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाण्याचा प्रकार सध्या सुरू झाला आहे. शरीराला आवश्यक तेवढीच जीवनसत्त्वे मिळणे गरजेचे आहे. कोणत्याही सल्ल्याशिवाय किंवा कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता आहे याची चाचणी केल्याशिवाय अशा रीतीने गोळ्या घेणे घातक ठरू शकते.’

‘व्यायाम ‘उद्या’ करायची गोष्ट नाही. तर तो ‘आत्ता’पासून सुरू करावा,’ असा सल्ला लीना मोगरे यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या, ‘कोणत्याही वयात व्यायाम सुरू करणे शक्य आहे. जीवनशैलीत आगंतुकपणे आलेली ‘खुर्ची’ हे अधिकाधिक समस्येचे कारण आहे. काही परदेशी कंपन्यांनी तर ऑफिसमधील खुच्र्या काढून टाकल्या आहेत. शरीर हे नेहमी क्रियाशील असणे आवश्यक आहे. अगदी घरच्या घरीही २० मिनिटे किंवा अर्धा तास व्यायाम करता येऊ शकतो. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. दिवसाला १० हजार पावले चालण्याची संकल्पना ही हॉटेलमधील वेटरवरून आली. तो सतत इकडेतिकडे चालत असतो. त्याप्रमाणे शरीराला नेहमी चालण्याची सवय लागणे आवश्यक आहे.’

‘राग येणे किंवा चिडचिड होणे हे माणूस असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे होताच कामा नये, असा गैरसमज आहे. भावनांना वाट करून देणे किंवा त्या व्यक्त करणे आवश्यक आहे. राग आल्यानंतर ‘राग येतो’ असे व्यक्त केल्यानेही ताण हलका होतो. समाजमाध्यमे, विविध प्रकारची गॅझेट्स यामुळे एका कामावर लक्ष केंद्रित होत नाही. त्या ऐवजी ते विविध गोष्टींवर थोडे थोडे विखुरले जाते. परिणामी दैनंदिन जीवनातील ताणतणाव वाढतो. काळागणिक अभ्यासातली बुद्धिमत्ता (आयक्यू) वाढत आहे. परंतु भावनिक बुद्धिमत्ता (ईक्यू) कमी होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. यामुळेच मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे,’ असे मत डॉ. संदीप केळकर यांनी व्यक्त केले. शालेय स्तरापासूनच भावनिक साक्षरतेविषयी शिक्षण देणे आवश्यक असल्याचा मोलाचा सल्ला या वेळी डॉ. केळकर यांनी दिला.

तज्ज्ञ म्हणतात..

* राग किंवा चिडचिड अशा भावनांना वाट करून देणे आवश्यक

* समाजमाध्यमांमुळे लक्ष विचलित आणि ताणात भर

* भावनिक साक्षरतेविषयी शाळेतच मार्गदर्शन गरजेचे

* व्यायाम ‘उद्या’ करण्याची गोष्ट नाही

* खुर्चीमुळे पाठिचा कणा मोडला

* जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाणे हे ‘फॅड’

* एकच आहार पद्धती सगळ्यांना लागू होऊ शकत नाही