मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी विशेष सुरक्षा सप्ताह राबवूनही काहीही परिणाम होत नसल्याने अखेरीस राज्य महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तामिळनाडूतील एका तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीने नोव्हेंबरपासून या कारणांचा बारकाईने शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीचा अहवाल दोन-तीन महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे यांनी याला दुजोरा दिला आहे. एक्स्प्रेस-वेवर उभ्या असलेल्या एका वऱ्हाडी बसला टेम्पोने दिलेली धडक असो वा एका मार्गावरील गाडी नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध मार्गावर जाऊन अन्य गाडीवर आदळणे आदी अपघात पाहता केवळ अतिवेगच त्यास कारणीभूत आहे हे खरे आहे. वेगावर नियंत्रण ठेवावे, यासाठी कितीही सुरक्षा सप्ताह राबविले तरीही लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळेच महामार्गावरील अपघातांची कारणमीमांसा आम्ही सुरू केली होती. त्यानुसारच तामिळनाडूतील जे. पी. रिसर्चर या कंपनीला याबाबत अहवाल सादर करण्यात सांगितले आहे. या कंपनीने तामिळनाडूमध्ये अपघात रोखण्याबाबत सुचविलेले उपाय उपयोगी ठरले होते.
अपघात का होतात यासह अपघात रोखणे कसे शक्य आहे, याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या कंपनीने शोध घेतला होता. एक्स्प्रेस-वेवर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर या तज्ज्ञ कंपनीने आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. तो पटल्याने आम्ही त्यांची नियुक्ती केली आहे. एक्स्प्रेस-वेवरील अपघात ही सर्वाचीच चिंतेची बाब असल्यामुळे त्याबाबत काय करता येईल, यासाठी सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.   
‘एक्स्प्रेस-वे’वर होणाऱ्या अपघातांना अतिवेगच कारणीभूत आहे, हे सांगण्याची गरज नाही. सोमवारी मारुती स्विफ्ट गाडीला झालेला अपघात ही त्याचीच परिणती आहे. मुंबईतील रस्त्यावर धावण्याऱ्या गाडय़ा जर ताशी १३० ते १४० वेगाने धावू लागल्यावर त्यावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता अधिक आहे, असे मतही कांबळेही यांनी व्यक्त केले.

तज्ज्ञांनी दाखविलेल्या काही त्रुटी
ऌ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची बांधणी होऊन आठ-दहा वर्षे झाली आहेत. मात्र या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने होत नाही. वास्तविक त्यामुळे रस्ते बुळबुळीत होऊन गाडीने वेग घेतला तरी त्याची जाणीव होत नाही.
ऌ रस्ता दुभाजकाची कमी उंची
ऌ कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता
ऌ कायमस्वरूपी स्पीड गनची व्यवस्था

एक्स्प्रेसवेवरील अपघातातील मृत – ८४१
महामार्ग पोलिसांनी केलेली कारवाई (१५ ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१३ पर्यंत) – अतिवेग वा तत्सम प्रकरणे दाखल – २,०१,५८०