प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारमधून जिलेटीन सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्याचे गृहराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी सांगितले. अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले.

गाडीची नंबर प्लेट बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.वाहतूक पोलिसांनी ही स्कॉर्पियो ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.

अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकांना ही कार आढळली. त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गामदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्कॉर्पिओची तपासणी सुरु केली. गाडीत जिलेटीनच्या २० कांडया सापडल्या. श्वान पथकालाही तपासासाठी तिथे आणले होते. फक्त जिलेटीन कांडया सापडल्या असे मुंबई पोलिसांच्या पीआरओने सांगितले.

स्फोटक साहित्य सापडल्यानंतर कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसच्या एटीएसचे पथकही तिथे येऊन गेले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosive material was found in car outside antillia its mukesh ambani home dmp
First published on: 25-02-2021 at 20:15 IST