‘‘लता मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्यातून विश्वाला मोहिनी घालण्याचे काम केले. त्यांच्या गाण्यांमुळेच अनेक शब्दांची अभिव्यक्ती कळली. त्या शब्दांची खोली, भावना या गाण्यातून समजत राहिल्या. आपल्यासाठीच लतादीदी गायल्या असे प्रत्येकाला वाटते आणि ज्यांनी ज्यांनी त्यांची गाणी ऐकली त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर लतादीदींनी गारूड केले. त्या विश्वाच्या गायिका आहेत,’’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘लता’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, लता मंगेशकर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही मला मुख्यमंत्री म्हणूनच बोलवावे, ही इच्छा व्यक्त करत निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केले. या वेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार,  पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, गायक सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते.

‘‘लता मंगेशकर यांना एका पुस्तकात बसवणे अवघड आहे. दीदींची गाणी ऐकली की, मला माझ्या आईची आठवण येते, असे भावनिक शब्द शेलार यांनी व्यक्त केले. तर लता मंगेशकर यांच्याबद्दल संपूर्ण जग बोलत आहे याचा आनंद आहे. त्यांचे नाव पुढील हजारो वर्षे असेच राहावे,’’ अशी इच्छा सुलोचनादीदी यांनी व्यक्त केली.

लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त ‘लता ९०’ या कार्यक्रमांतर्गत ‘दीदी आणि मी’ हा विशेष कार्यक्रम संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केला. कार्यक्रमात लता मंगेशकर यांचा जीवनपट गाण्यांमध्ये गुंफून रसिकांसमोर मांडला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ‘दीदींची घरामध्ये मलाच सर्वात जास्त माया मिळाली आहे’, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी या वेळी सांगितले. तसेच जिथे साहित्याचे साम्राज्य संपते, तिथे लता मंगेशकर यांच्या सुरांचे साम्राज्य सुरू होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमात लता मंगेशकरांच्या लहानपणीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमात लतादीदींची अजरामर गाणी सादर करण्यात आली.