राज ठाकरे, नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, संजय निरुपम या शिवसेनेत विविध पदे भूषविलेल्या नेत्यांनीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास विरोध दर्शविला आहे.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हे दादरमध्येच असावे, पण महापौर बंगल्यात ते उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली. सरकार वाचविण्यासाठीच शिवसेनेला महापौर बंगला आंदण देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समझोता केला असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा बळकावयाची असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. वाघाच्या जबडय़ात हात घालण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे तर भाजपला तडीपार करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यास सर्वात आधी विरोध केला. त्यापाठोपाठ युतीच्या पहिल्या सरकारमध्ये काही काळ कृषीमंत्रिपद भूषविलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी सूर लावला. महापौर बंगल्याऐवजी ‘मातोश्री’मध्ये स्मारक उभारण्याची सूचना त्यांनी केली. शिवसेनेने राज्यसभेवर संधी दिलेल्या संजय निरुपम यांनीही सरकारी खर्चाने तसेच महापौर निवासस्थानी स्मारक उभारण्यास विरोध केला.