राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. आता बारावीच्या परीक्षा मेअखेर आणि दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. राज्यातील अन्य केंद्रीय शिक्षण मंडळांच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत घेण्याची घोषणा शिक्षण विभागाने मार्चमध्ये केली होती. यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीची, तर १३ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. करोनामुळे यंदाच्या परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या त्या-त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच परीक्षा घेण्यात येणार होत्या. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक साहित्यही पाठविण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकण्याची मागणी होत होती.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,  राज्य मंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी या वेळी उपस्थित होते.

आयआयटी, जेईई आणि ‘नीट’च्या परीक्षा तसेच इतर उच्चशिक्षण अभ्यासक्रमातील प्रवेश लक्षात घेऊन १२वीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. बारावीच्या परीक्षेसाठी व्यवस्था विकसित करण्यात यावी, केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष द्यावे, परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, त्याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

राज्यातील सध्याची करोनास्थिती गंभीर असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आदींशी चर्चा केल्यानंतरच या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आरोग्य आणि सुरक्षिततेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यानुसार या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील. तसेच या बदलाबाबत अन्य परीक्षा मंडळांनाही कळविण्यात येणार असून, त्यांनीही परीक्षांचा फेरविचार करावा, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

बारावीची मेअखेर, दहावीची जूनमध्ये परीक्षा

दहावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. करोनास्थिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.