06 March 2021

News Flash

पूर्व मुक्त मार्गाचा ठाणे शहरापर्यंत विस्तार

काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश

(संग्रहित छायाचित्र)

दक्षिण मुंबई ते घाटकोपपर्यंत असलेल्या पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याचा आणि ते काम प्राधान्याने पूर्णत्वाला नेण्याचा आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच ठाणे व परिसरातील विविध प्रकल्पांची कामे जलदगतीने व्हावीत यासाठी समन्वय (नोडल) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले आहेत.

ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढ झाली असून त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासह बैठक घेतली. तीन हात नाकाची फेररचना, आनंदनगर नाका ते साकेत उन्नत मार्ग, कोपरी ते पटणी खाडीपूल, कोलशेत ते गायमुख खाडी मार्ग, तसेच कोलशेत-कासारवडवली आणि गायमुख येथे खाडीपलीकडील भागांना जोडणारे खाडीपूल, नवीन ठाणे ग्रोथ सेंटर आदी महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचा आदेश शिंदे यांनी दिला.

पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी अशा विविध ठिकाणांकडे जाणारी सर्व वाहतूक ठाणे शहरातून जात असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवट ठाण्याजवळ होणार आहे. तसेच भिवंडी व कल्याण परिसरात एमएमआरडीएमार्फत व्यावसायिक संकु ल (ग्रोथ सेंटर) विकसित करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आदी परिसरांचा जीव गेली काही वर्षे वाहतूककोंडीमुळे मेटाकुटीला आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

सुधारित आरेखन..

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या भिवंडी ते कल्याण टप्प्याच्या आरेखानाबाबत असंख्य तक्रारी होत्या. कल्याणचा फार थोडा भाग मेट्रोने जोडला जाणार असल्यामुळे बहुसंख्य कल्याणवासीय या मेट्रोपासून वंचित राहिले असते. त्यामुळे या मार्गाचे आरेखन बदलण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले होते. सुधारित आरेखन तयार करण्यात आले असून या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:23 am

Web Title: extension of east freeway to thane city abn 97
Next Stories
1 शाळा सुरू करताना व्यवस्थापनापुढे आव्हानांचे डोंगर!
2 मुंबईत १०६९; ठाणे जिल्ह्य़ात ५६५ नवे रुग्ण
3 म्हाडा सोडत विजेते घरापासून वंचित
Just Now!
X