व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या  सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील  विद्यार्थ्यांंना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांची  वाढीव मुदत देण्यात येणार असल्याची  माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांंना हा मोठा दिलासा आहे.

वैदयकीय आणि अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थ्यांंना प्रवेश घेताना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे  बंधनकारक असते. मात्र टाळेबंदीच्या काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे अवघड असल्याने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी विकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची सचिव स्तरावर तातडीने बैठक घेत या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला.  जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होता कामा नये, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला आहे.