News Flash

घर विजेत्या गिरणी कामगार-वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

प्रथम सूचनापत्रानुसार विजेत्या कामगार-वारसांना १२ जुलै ते ९ सप्टेंबर असा ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

घर विजेत्या गिरणी कामगार-वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : गिरणी कामगारांच्या २०२० च्या सोडतीतील विजेत्यांना आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० दिवसांची ही मुदतवाढ असून आता कामगार-वारसांना ९ ऑक्टोबपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.

गिरण्यांच्या जमिनींवरील घरांसाठी १ मार्च २०२० रोजी बॉम्बे डाइंग टेक्स्टाईल मिल, बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या तीन हजार ८९४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्या कामगार-वारसांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी त्यांच्याकडून  मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. या सोडतीला देखरेख समितीची स्थगिती आहे. असे असले तरी पात्रता निश्चितीसाठी बराच वेळ लागत असल्याने स्थगिती उठेपर्यंत पात्रता निश्चितीचे काम पूर्ण करून घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत मुंबई मंडळाने विजेत्या कामगार-वारसांना प्रथम सूचनापत्रे पाठवली आहेत. पात्रता निश्चिती पूर्ण झाली आणि तोपर्यंत स्थगिती उठली नाही तर घरांचा ताबा देणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

प्रथम सूचनापत्रानुसार विजेत्या कामगार-वारसांना १२ जुलै ते ९ सप्टेंबर असा ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ही मुदत ९ सप्टेंबरला संपली असून अनेकांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. करोनाकाळात वयोवृद्ध कामगार, गावी असलेले कामगार कागदपत्रे जमा करू शकलेले नाहीत. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

‘वेळेत कागदपत्रे सादर करा’

या मुदतवाढीनुसार आता कामगार-विजेत्यांना ९ ऑक्टोबपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत. या सोडतीतील काही विजेत्यांना प्रथम सूचनापत्रे मिळालेली नाहीत. अनेक कारणांनी प्रथम सूचनापत्र टपाल खात्याकडून परत आली आहेत. संबंधित विजेत्यांनी हे पत्र म्हाडा भवनात येऊन घेऊन जावे आणि वेळेत कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन म्हसे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 12:52 am

Web Title: extension submission documents house winning mill workers ssh 93
Next Stories
1 हंगामापूर्वीच ऊसदर घोषणा बंधनकारक?
2 नवी मुंबईत आलिशान घर मिळविण्याच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या प्रयत्नाला चाप!
3 एसटीच्या ताफ्यात नवीन वर्षात १२०० बस
Just Now!
X