शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. राज्य शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतू २००८ आणि २००९ या काळात कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. तसेच २००१ ते २०१६ या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे काही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

कर्जमाफीचा अर्ज करण्यासाठी कुठलीही फी आकारण्यात येत नाही. अर्ज पूर्णपणे मोफत आहे. शेतकऱ्यांना या http://csmssy.mahaonline.gov.in सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. त्याचबरोबर हा अर्ज भारताना शेतकऱ्यांना आधार कार्ड जवळ बाळगणे गरजेचे असून ओटीपी क्रमांकासाठी मोबाईल क्रमांक देणे तसेच मोबाईल जवळ बाळगणे आवश्यक आहे.