युवा सेनेत सहभागी व्हायचे म्हणून ऑस्ट्रेलिया सोडून भारतात आलेल्या महिलेने युवा सेनेचे सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला धमकावून एक कोटी रुपये खंडणी मागितल्याची तक्रार पूर्वेश यांनी संबंधित महिलेविरोधात केली आहे. मात्र, ही तक्रार खोटी असून ती रद्द करण्याची मागणी ऑस्ट्रेलियन महिलेने केली आहे. महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पूर्वेश यांना दिले आहेत.
युवा सेनेत सामील व्हायचे म्हणून ही महिला भारतात आली. मात्र, तिचे वय मर्यादेपेक्षा अधिक असल्याने तिला युवा सेनेत सहभागी करून घेता येऊ शकले नाही. मात्र, दरम्यानच्या काळात महिलेचे पूर्वेश यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून ती दोन वेळा गर्भवती राहिली आणि दोन्ही वेळेस पूर्वेशने तिला गर्भपात करण्यास सांगितला. त्याची खात्री पटवून घेण्यासाठी त्याने तिला मुंबईला बोलावले होते. वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची तसेच तिकिटाचीही त्याने व्यवस्था केली होती. या सगळ्याबाबत महिलेच्या पतीला नंतर कळले. परंतु त्यानंतरही त्याने सगळे विसरून जाण्याबाबत समजावले. मात्र, पूर्वेशने या प्रकरणी महिला आणि तिच्या पतीविरोधातच वर्तकनगर पोलिसांत खंडणीची तक्रार केल्याचा आरोप महिलेचे वकील शिरीष गुप्ते यांनी केला. हे सगळे मुंबईत घडलेले असताना केवळ वडिलांचा ठाण्यात दबदबा असल्याच्या कारणास्तव पूर्वेश यांनी तेथे गुन्हा दाखल केल्याचाही आरोप त्यांनी केला. पूर्वेश यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचा दावा करीत पूर्वेशने केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी या ऑस्ट्रेलियन महिलेने न्यायालयाकडे केली आहे. तसेच पूर्वेश याची तक्रार कशी खोटी आहे आणि ही तक्रार करण्यामागे आपल्यासोबतचे प्रेमप्रकरण कारणीभूत असून त्याचे पुरावेही या महिलेने याचिकेसोबत जोडले आहेत. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिले.