गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने यंदा प्रथमच या प्रवाशांसाठी ‘डेमू’ (डिझेल-इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सोडलेल्या गाडय़ांमध्ये चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आदी ठिकाणच्या प्रवाशांची गर्दी होऊ नये; यासाठी पनवेल ते चिपळूण यांदरम्यान ही सेवा चालवण्यात येत आहे. ८ ते २८ सप्टेंबर या दिवसांमध्ये धावणाऱ्या या डेमू गाडय़ांचे वेळापत्रक आणि तिकीटदर अद्याप जाहीर झालेले नाहीत.
मुंबईहून कोकणात खास गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाडय़ांची घोषणा आणि त्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच या गाडय़ा फुल होतात. अनेकदा या गाडय़ांमध्ये खेड, चिपळूण, रोहा येथे जाणाऱ्या प्रवाशांचाही भरणा असतो. तसेच या ठिकाणी जाणारे बहुतांश मुंबईकर खास चारचाकी गाडय़ा करून गावाला जात असतात. त्यामुळे तळकोकणात जाणाऱ्या गाडय़ांमधील प्रवाशांची आणि रस्त्यांवरील वाहनांची गर्दी काही प्रमाणात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण यांदरम्यान डेमू सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाडीच्या ३६ फेऱ्या होणार असून ही गाडी पनवेलहून सकाळीला ११.१० सुटून सायं. ४.०० वाजेपर्यंत चिपळूणला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी चिपळूण येथून संध्याकाळी ५.३० वाजता निघणार असून पनवेल येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.

ही सेवा ८ ते २८ सप्टेंबरदरम्यान चालवण्यात येईल. ही गाडी पॅसेंजर म्हणून चालवायची की, आरक्षित म्हणून याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने गाडीचे तिकीट दर आणि वेळापत्रकही ठरलेले नाही.