बेकायदेशीर कृत्यांविरोधात बेधडक कारवाई करणारे वसंत ढोबळे अधिकृतपणे रविवारी  पोलीस सेवेतून निवृत्त झाले. विविध आरोपांच्या ११८ प्रकरणांतून निर्दोष मुक्तता मिळाली असली तरी त्यांना निवृत्तीनंतरही विश्रांतीची संधी मिळणार नाही. त्यांनीच कारवाई केलेल्या तब्बल हजारहून अधिक प्रकरणांमध्ये त्यांना न्यायालयात हजेरी द्यावी लागणार आहे.
ढोबळे हे नाव १९८२ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आले ते उशिरापर्यंत चालणाऱ्या बारविरुद्ध त्यांनी सुरु केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे.  ढोबळे ज्या पोलीस ठाण्यात असत त्या हद्दीतील बारवाल्यांची रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्याची हिंमतच होत नसे.
१९९४ मध्ये मात्र पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांना अटक झाली. त्यांना बडतर्फही करण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन पुन्हा सेवेत येण्यात त्यांनी यश मिळविले. १९९६ मध्ये पुन्हा त्यांनी नामचीन गुंडावर कारवाई केली.
 अरुप पटनाईक यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा ढोबळे यांना बोलाविले आणि जे काही बेकायदेशीर सुरु आहे त्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार त्यांना देऊन टाकला. ढोबळे यांनीही अनेकांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर इतक्या तक्रारी आल्या की, त्यांची दखल घेऊन ढोबळेंना बदलणे शासनाला भाग पडले.  सहायक आयुक्त म्हणून त्यांची बदली वाकोल्यात झाली आणि फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा ठपकाही ढोबळेंवर आला. हरविलेल्या मुलांचा शोध घेणाऱ्या विभागात ढोबळेंची बदली झाली. परंतु तेथेही ते शांत बसले नाहीत. हरविलेल्या व्यक्तींपैकी तब्बल ७०० ते ८०० जणांना शोधून काढण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.