स्मार्टफोन ज्याच्या हातात आहे त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्स अॅप’ नाही, असा माणूस सध्या शोधूनही सोपडणार नाही. मोबाईलवरील मॅसेजिंगला पर्याय म्हणून उपलब्ध झालेल्या ‘व्हॉट्स अॅप’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत मॅसेजिंग म्हणजे ‘व्हॉट्स अॅप’ असा पायंडा गेल्या वर्षभरात पाडला आहे. परंतू सोशल मिडीयावर दबदबा असणाऱ्या फेसबुकने आता मोबाईल मेसेजिंग कंपनी ‘व्हॉट्स अॅप’ला विकत घेतले असून तब्बल १९ अब्ज डॉलर्सला हा व्यवहार होणार आहे. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणा-या गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल या कंपन्यांनीही आजवर एवढा मोठी व्यवहार केला नसल्याने, हा सर्वात मोठ्या रकमेचा व्यवहार असणार आहे. १९ अब्ज डॉलर्सच्या या व्यवहारात १२ अब्ज डॉलर्स फेसबुक स्टॉक, ४ अब्ज डॉलर्स रोख रक्कम आणि उरलेले ३ अब्ज डॉलर्स हे ‘व्हॉट्स अॅप’च्या एकूण ५५ जणांच्या टीमला चार वर्षांचा करार संपल्यानंतर स्टॉक स्वरूपात देण्यात येणार आहेत.
‘व्हॉट्स अॅप’च्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचू दिला जाणार नसल्याचे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू आता ‘व्हॉट्स अॅप’ वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने ‘व्हॉट्स अॅप’ वापरकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. फेसबुक आणि ‘व्हॉट्स अॅप’मधला व्यवहार मेसेजिंग बाजारातले फेसबुकचं महत्व वाढवेल आणि काही नवे बदल घडवून आणेल अशी तज्ञांना आशा आहे.