विकसनशील देशांमध्ये मोफत इंटरनेट सुविधा पुरविण्याचे फेसबुकचे जनक मार्क झुकेरबर्ग याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची सुरुवात फेसबुकने केली असून मंगळवारी भारतात ‘Internet.org’  या सेवेची सुरुवात करण्यात आली. या सेवेच्या माध्यमातून मोबाइल इंटरनेटधारकांना मोफत सुविधा मिळणार आहे. पण सध्या ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांना रिलायन्सचे कार्ड घेणे बंधनकारक आहे.
फेसबुकने ही सुविधा भारतात आणण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनची मदत घेतली आहे. या सेवेमध्ये ३३ संकेतस्थळे आणि सेवा मोफत वापरता येणार आहे. यात विकिपीडिया, ट्रान्सलेटर, विकिहाऊ, क्रीडा संकेतस्थळ, आरोग्यविषयक संकेतस्थळांचा समावेश आहे. रिलायन्स ग्राहकांना ही सेवा मिळवण्यासाठी http://www.internet.org   या संकेतस्थळावर लॉगइन करा किंवा १८००-३००-२५३५३ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन कंपनीने केले आहे.