नागरिकांना घराजवळ करोना लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळावी यासाठी महानगरपालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निवासी संकुलांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. ३१ मे पर्यंत लसीलकरण पूर्ण करण्याचे पालिके चे लक्ष्य असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत सध्या दररोज सरासरी ४० ते ४५ हजार पर्यंत कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या दर दिवशी लाखांपर्यंत वाढविण्याचे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यासाठी महानगर पालिकेने नागरिकांना पूर्वनोंदणी न करता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पालिका करणार असल्याची माहिती  काकाणी यांनी दिली.

‘निवासी संकुला पर्यंत लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे’, असे काकणी यांनी सांगितले.

४५ वर्षांपर्यंतचे ४० लाख लोक

४५ वर्षांपर्यंतच्या सर्वांना लस देण्याचा निर्णय के ंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ४५ ते ६० वर्षांमधील सहव्याधी असलेल्यांना व ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाते आहे. सध्या १०० ठिकाणी लसीकरण होत आहे. ४५ वर्षांपुढील सर्वांना लस द्यायची असल्यास लसीचा साठाही योग्य प्रमाणात असून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचीही तयारी असल्याचे काकाणी यांनी सांगितले. ४५ वर्षांवरील सुदृढ गटातील नागरिक ४० लाखाच्या आसपास आहेत.

दोन पाळ्यांमध्ये लसीकरण

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिका आता दोन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करणार आहे. सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशा दोन पाळ्यांमध्ये आता लसीकरण होणार आहे.