मध्य रेल्वेची माहिती; खाद्यपदार्थ स्टॉल्स, प्रसाधनगृह इत्यादींची पाहणी करणार

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील सर्वच सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉल्स, प्रसाधनगृह यासह आसनव्यवस्थेची माहिती घेण्यात येत असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी दिली. हा आढावा घेतल्यानंतर गरज असेल तेथे आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेत २२ प्रवाशांचे बळी गेले. त्यानंतर रेल्वेकडून गर्दीच्या स्थानकातील काही सुविधांचाच आढावा घेतला जात होता. मात्र रेल्वेने आता स्थानकातील सर्वच सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण येत्या काही महिन्यांत परळ टर्मिनस होणार आहे. यात दोन्ही बाजूंना फलाट होईल. येथून परळ लोकलही सुटेल. हे पाहता सध्याच्या परळ स्थानकातील फलाटांवरही प्रवाशांना वावरण्यासाठी कितपत जागा आहे, त्याचा आढावा घेण्यात येत आहे.

यासह कुर्ला, कांजूरमार्ग आणि अन्य काही स्थानकांत दोन्ही बाजूंना असणाऱ्या फलाटांचाही आढावा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या स्थानकांबरोबरच सर्वच स्थानकांतील खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्सचीही माहिती घेण्यात येत आहे.

गर्दीच्या स्थानकात या सुविधांचा प्रवाशांना काही अडथळा ठरत आहे का आणि त्यामुळे कोणता धोका तर नाही ना याचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्याप्रमाणे स्टॉल्स हटविण्यात येतील किंवा त्याचा आकार कमी करण्याच्या सूचना केल्या जातील, असे सांगण्यात आले. स्थानकात आवश्यक प्रसाधनगृहांचीही माहिती घेण्यात येईल.

चर्चगेट स्थानकाप्रमाणेच सीएसएमटी स्थानकातही प्रवाशांसाठी नवीन आसनव्यवस्था केली जात आहे. अशा प्रकारची आसनव्यवस्था लोकप्रतिनिधींच्या निधीतून अन्य स्थानकातही करण्यात येणार असल्याचे जैन म्हणाले.

१७ पादचारी पुलांची उभारणी

मध्य रेल्वेने १७ पादचारी पुलांची उभारणी सुरू केली आहे. आणखी २२ पादचारी पुलांची उभारणी लवकरच केली जाणार असून सरकते जिने आणि उद्वाहक उभारण्याचे कामही होत असल्याचे सांगण्यात आले.