बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र दर्शनकरिता येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्याबरोबरच लहान मुलांसाठी नवीन खेळाची साधने उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याकरिता वन खात्यातर्फे २० कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत. या निधीतून उद्यानातील रुग्णालयातही काही सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

मुंबईच्या जवळचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते. देशी-परदेशी पर्यटक उद्यानात फिरण्याकरिता येत असतात. येथील उद्यानातील लेणी, जैवविविधता हे पर्यटकांच्या आकर्षणाचे कारण आहेच. शिवाय येथील व्याघ्र दर्शन प्रकल्पही पर्यटकांची गर्दी खेचत असते. लहान मुलांकरिता बालोद्यानात काही खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, परंतु आता नव्या योजनेत त्यात आणखी काही साधनांची भर पडणार आहे. याचबरोबर उद्यानातील व्याघ्र विहाराच्या ठिकाणी तिकीट खिडकीजवळ पर्यटकांना बसण्याची सोय नाही. आपली खेप येईपर्यंत पर्यटकांना येथे ताटकळत उभे राहावे लागते. म्हणून या ठिकाणी बसण्याची सोय करण्यात येणार आहे. तेथून जवळच असलेल्या बालोद्यानाचीही पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. लहान मुलांना आता उपलब्ध असलेली साधने अपुरी पडतात. एकाच वेळा दोन-दोन शाळांची मुले आली की मुलांना सहलीचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उद्यानातील प्राण्यांच्या इस्पितळाचे बांधकाम जुने आहे. ते नव्याने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राण्यांच्या आरोग्य व देखभालीसाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी कामाची निविदा नुकतीच काढली आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक अधिकारी विकास गुप्ता यांनी दिली.