विरारमधून २७ वर्षांची कविता बाडला ही तरुणी अचानक बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी कविताच्याच मोबाइलवरून फोन येऊ लागले. अपहरणकर्ते हुशार होते. कसलाच सुगावा लागू देत नव्हते. त्यांना पकडण्यासाठी सापळा लावण्याचे ठरवले. जराही चूक झाली असती तर अपहरणकर्ते कायमचे निसटले असते..
१५ मे २०१६. विरार येथे राहणारी कविता बाडला (२७) ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली होती. रात्र झाली तरी ती घरी परतली नाही. तिचे कुटुंबीय काळजीत होते. त्यांनी सगळीकडे चौकशी सुरू केली. मात्र कविताचा काही पत्ता लागत नव्हता. ती ऑफिसला पोहोचलीच नसल्याचे त्यांना समजले आणि काळजात धस्स झाले. दुसऱ्या दिवशी कविताची बहीण शीतल कोठारीने अर्नाळा पोलीस ठाण्यात कविता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पण पुढच्या दिवशी, १७ मे रोजी तिचे वडील किशनलाल कोठारी यांना कविताचा फोन आला. त्यांनी घाईघाईने तो फोन उचलला. पण पलिकडे कविता नव्हती. पलीकडून धमकीच्या आवाजात बोलणाऱ्या व्यक्तीने कविता जिवंत हवी असेल तर ३० लाख रुपये आणि तीन किलो सोने तयार ठेवा, असे बजावून फोन बंद केला.
कविताचे खंडणीसाठी अपहरण झाले असल्याचे एव्हाना उघड झाले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर कविता बाडला विरारमधील अर्नाळा येथे एकटीच राहत होती. ती एका खासगी मार्केटिंग कंपनीत कामाला होती. तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. तिचे वडील एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होते. अशा तरुणीचे कुणी अपहरण केले असावे, हे कळायला मार्ग नव्हता. पालघरच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी तरुणीच्या अपहरणाचे संवेदनशील प्रकरण असल्याने स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तिच्या विभक्त झालेल्या पतीची, कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची मित्र मैत्रिणींनी, तिच्या वडिलांच्या व्यावसायिक हितशत्रूंची चौकशी सुरू केली. पण हाती काही लागत नव्हते.
दरम्यान, अंधेरी येथे एका लोकलमध्ये कविताचा लॅपटॉप असलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या हाती लागली. त्यांनी तिच्या कुटुंबीयांना कळवल्यानंतर याचा उलगडा झाला. यावरून रेल्वे प्रवासादरम्यान कविताचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण अपहरणकर्त्यांच्या फोनची वाट पाहण्याशिवाय पोलिसांकडे पर्यायच नव्हता. पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी कविताचे वडील किशनलाल कोठारी यांना अपहरणकर्त्यांचा फोन आल्यावर जास्त वेळ बोलण्याची सूचना केली.
या घडामोडी सुरू असतानाच पोलिसांना डहाणूच्या वाणगाव चारोटीच्या जंगलात सुटकेसमध्ये एका तरुणीचा पूर्ण जळालेल्या अवस्थतेतील मृतदेह आढळळा. मृतदेहावरील जीन्सचा एक तुकडा पोलिसांना मिळाला. हा मृतदेह कुणाचा ते समजत नव्हतं. हा मृतदेह कविताचा असेल का, अशी शंका पोलिसांच्या मनात डोकावली. पण अपहरणकर्त्यांकडून काहीही कळू न शकल्याने त्यांनी आपला भर कविताचा शोध घेण्यावर दिला. अशातच अपहरणकर्त्यांनी कविताच्या वडिलांना फोन केला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कोठारी यांनी त्यांच्याशी वाटाघाटी करण्यास सुरुवात करीत संभाषण लांबवत नेले. पोलिसांच्या इशाऱ्यानुसार, कोठारी यांनी अपहरणकर्त्यांना ३० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. अपहरणकर्ते पैसे घेण्यास येतील, तेव्हा त्यांना पकडायचे, अशी पोलिसांची योजना होती. पण ते दर वेळी कोठारी यांना पैसे घेऊन वेगवेगळय़ा ठिकाणी बोलावत होते. त्यामुळे पोलिसांना संधी मिळत नव्हती.
अखेर तलासरी महामार्गाजवळील पुलाजवळ भेटण्याचे ठरले. पोलिसांनी ठरलेल्या ठिकाणाभोवती सापळा रचला. तलासरी, चारोटी, मनोर, विरार फाटा या परिसरांत पोलीस कर्मचारी दबा धरून बसले होते. ठरल्याप्रमाणे कविताचे वडिल बनावट नोटा भरलेली बॅग घेऊन तलासरी येथे पोहोचले. तेथे एका गाडीजवळ पोहोचताच आतमध्ये बसलेल्या तिघांनी त्यांच्याजवळची बॅग हिसकावून मुंबईच्या दिशेने पळ काढला. परंतु, पोलिसांनी पाठलाग करून मनोरच्या हद्दीत दबा धरून बसलेल्या पथकाच्या मदतीने त्यांना जेरबंद केले. पण या कटाचा म्होरक्या दुसराच असल्याचे त्यांना कळले. त्य़ांनी अपहरणकत्र्य़ाकरवी खोटे सांगून या म्होरक्याला विरारच्या जीएम हॉटेलबाहेर बोलवले. तिथे साध्या वेशातल्या पोलिसांनी सापळा रचला. पण त्या ठिकाणी बसलेल्या अपहरणकर्त्यांना भेटायला एक महिला आली. पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले. परंतु दुरून हा प्रकार पाहणाऱ्या दुसऱ्या आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचीही पोलिसांनी गचांडी धरली. अखेर कविताचे अपहरण करणारे ताब्यात आले होते. पण कविता तेथे नव्हती. अपहरणकर्त्यांनी कविताचे अपहरण केल्यानंतर १५ मिनिटांतच तिची हत्या केली होती. वाणगाव जंगलात सापडलेला मृतदेह कविताचाच असल्याचेही उघड झाले.
कविताच्याच कंपनीत काम करणाऱ्या मोहीत भगत याने हा संपूर्ण कट रचला होता. मोहित हा मूळचा जम्मू काश्मीरचा होता. कविताला बडेजाव करण्याची सवय होती. माझ्या वडिलांचे ज्वेलर्सचे दुकान आहे, आम्ही खूप श्रीमंत आहोत असे ती सतत सांगायची. त्यातून मोहीतच्या डोक्यात अपहरणाचा कट शिजला. त्याने राम अवतार शर्मा (२६), मनीष सिंग (३६), शिवकुमार शर्मा (२५) आणि युनिता रवी (३५) यांना या कटात सामील करून घेतले. हे सर्वजण परिसरातील वेगवेगळय़ा कंपनीत कामाला होते. योजना यशस्वी झाल्यास प्रत्येकाला पाच लाख देण्याचे आश्वासन मोहितने दिले. १५ मे रोजी सकाळीच मोहितने कविताला फोन करून घरी भेटायला बोलवले. सकाळी साडेनऊ वाजता कविता मोहीतच्या ग्लोबल सिटी येथील घरी पोहोचली. घरात ठरल्याप्रमाणे सगळे हजर होते. कविता घरात शिरताच मोहितने तिचा गळा दाबला राम अवतार शर्माने पाय पकडले आणि पंधरा मिनिटातच तिला मारून टाकले. ठरल्याप्रमाणे दोन मोठय़ा सुटकेस आणून ठेवल्या होत्या. एका मोठय़ा सुटकेसमध्ये कविताचा मृतदेह कोंबला आणि दुसऱ्या सुटकेसमध्ये जुने कपडे भरले. एक भाडय़ाची गाडी ठरवली आणि ती डहाणूच्या दिशेने नेली. या जंगलात सुटकेस टाकून ती जाळायची होती. वाहनचालकाला जेवण्याचे निमित्त करून एकाने बाहेर नेले. उर्वरित चौघांनी सुटकेस टाकून ती पेट्रोल ओतून जाळून टाकली.
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आता अपहरणकर्त्यां आरोपींना जेरबंद केलं. पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, वळवी, सुतावणे, मदने, दोरकर, मोरे आदींनी ही कामगिरी केली. अपहरणकर्ते जरी गजाआड झालेले असले तरी कविताला वाचवू न शकल्याची खंत पोलिसांना आहे.
सुहास बिऱ्हाडे